तळेगावची वाट दाखवतेय ‘बिनविरोध’ची राजकारणात नवी दिशा; मावळ तालुक्यात उमटतोय एकमताचा सुर
मावळ तालुक्यातील सर्वच पक्षातील कार्यकर्त्यांच्या सोशल मिडियावर पोस्ट वायरल

मावळ – तळेगाव नगरपरिषद निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी संयुक्त बैठकीत जाहीर केल्यानंतर मावळ तालुक्यातील राजकीय वातावरणात नवा बदल जाणवू लागला आहे. अनेक वर्षांपासून चुरशीच्या लढती, कटुता, एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप यासाठी ओळखला जाणारा मावळ आता ‘समन्वय’ आणि ‘मतभेदांवर संवाद’ या नव्या राजकीय पद्धतीकडे वाटचाल करताना दिसत आहे.
हा निर्णय जाहीर झाल्यानंतर तळेगाव परिसरातील नागरिकांमध्ये समाधान आणि दिलासा व्यक्त होत आहे. कारण निवडणुकीच्या काळात उमेदवारांमधील संघर्षाचा परिणाम अनेकदा गावोगावच्या समाजामध्ये फुटी, वैर आणि तणाव निर्माण करणारा होत असे. मात्र यावर्षी टाळेबंदीऐवजी विकासाच्या मुद्द्यांवर एकमताने पुढे जाण्याचा संदेश देण्यात आला आहे.
सोशल मीडियावर या निर्णयाचे जल्लोषाने स्वागत होत असून “तळेगावने सुरुवात केली, आता संपूर्ण मावळ तालुक्यात निवडणुका बिनविरोध व्हाव्यात” असा सुर नागरिक, कार्यकर्ते आणि राजकीय वर्तुळात उमटताना दिसत आहे. फेसबुक, व्हॉट्सअॅप ग्रुप्स, आणि स्थानिक इंस्टाग्राम पेजवर #बिनविरोध_मावळ हा हॅशटॅग ट्रेंडमध्ये आहे. विशेष म्हणजे, सामान्य नागरिकदेखील आता गाव पातळीवरील एकत्रित विकास, शांतता आणि सलोखा यावर भर देण्यासाठी आवाज उठवत आहेत.
नेत्यांनी या निर्णयामागे विकासाला प्राधान्य, मतभेदांपेक्षा एकमेकांचा सन्मान आणि प्रशासनातील स्थैर्य याचे कारण सांगितले आहे. तळेगाव नगरपरिषदेत येत्या पाच वर्षांसाठी एकसंघ विकास आराखडा तयार करून त्या आराखड्याला गती देणे, हे या बिनविरोध निर्णयाचे मुख्य ध्येय असल्याचे सांगण्यात येत आहे.
याचा प्रभाव आता मावळमधील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर पडताना दिसत आहे. लोणावळा, वडगाव, जिल्हा परिषद पंचायती समिती याठिकाणीही स्थानिक नेत्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. अनेक गावांमध्ये गटबाजी कमी करून एकाच उमेदवाराला पाठिंबा देण्याचा विचार स्थानिक स्तरावर तेजीत आहे.
अर्थात, काही ठिकाणी विरोधी भूमिका असलेले गट या निर्णयावर असंतोषही व्यक्त करत आहेत. “लोकशाहीत निवडणूक ही मतदाराचा हक्क आहे, बिनविरोध निर्णय लोकशाहीची ताकद कमी करतो” अशी मतेदेखील समोर येऊ लागली आहेत. मात्र त्याविरोधात समर्थकांचे म्हणणे असे की “विकासाचा आणि शांततेचा संघर्ष निवडणुकीच्या संघर्षापेक्षा महत्त्वाचा”.
एकंदरीत पाहता, तळेगावच्या बिनविरोध निर्णयाने तालुक्यात शांततेचा, सहकार्याचा आणि एकत्रित विकासाचा नवीन अध्याय सुरु केला आहे. हा प्रयोग कितपत यशस्वी ठरेल? तो इतर गावात आणि शहरांत रुजेल का? याकडे मावळच नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष लागून राहणार आहे.



