आंदर मावळच्या विकासाला वेग; ४३ किमीच्या महत्त्वाकांक्षी रस्त्याची आमदार सुनील शेळके यांच्याकडून पाहणी

टाकवे बुद्रुक : आंदर मावळ परिसरातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम आणि सुरक्षित करण्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या कान्हे–टाकवे–वडेश्वर–खांड–सावळा या प्रमुख मार्गाच्या कामाची आमदार आमदार सुनील शेळके यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. हिवाळी अधिवेशन २०२३-२४ दरम्यान ADB अंतर्गत मंजूर झालेला हा महत्त्वाकांक्षी रस्ता प्रकल्प आंदर मावळच्या विकासाला नवी दिशा देणारा ठरणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
सुमारे ४३ किलोमीटर लांबीच्या या रस्त्यापैकी २८ किलोमीटरचे काम सध्या प्रगतीपथावर असून विविध ठिकाणी रुंदीकरण आणि सुधारणा कामे सुरू आहेत. पाहणीदरम्यान काही ठिकाणी भौगोलिक आणि तांत्रिकदृष्ट्या आवश्यक बदल करणे गरजेचे असल्याचे निदर्शनास आले. संबंधित ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करून आमदार शेळके यांनी अधिकारी आणि ठेकेदारांशी चर्चा केली.
गेल्या वर्षभरापासून कामाच्या संथ गतीबाबत नाराजी व्यक्त करत त्यांनी कामाची गती वाढविण्याचे स्पष्ट निर्देश दिले. तसेच रस्त्याच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड न करता उच्च दर्जाची कामे करून हा प्रकल्प निर्धारित कालावधीत पूर्ण करण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना दिले.
यावेळी बोलताना आमदार सुनील शेळके म्हणाले की, आंदर मावळच्या सर्वांगीण विकासासाठी दर्जेदार पायाभूत सुविधा उभारणे हे आपले प्राधान्य आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना सुरक्षित, सुकर आणि आधुनिक रस्ते उपलब्ध व्हावेत यासाठी शासनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून विकासकामांना गती दिली जात आहे.
हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर कान्हे, टाकवे, वडेश्वर, खांड, सावळा आणि परिसरातील गावांच्या दळणवळण व्यवस्थेत मोठी सुधारणा होणार असून नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित, जलद आणि सोयीस्कर होणार आहे. त्यामुळे आंदर मावळच्या आर्थिक, सामाजिक आणि पर्यटन विकासालाही मोठी चालना मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
यावेळी आमदार सुनील शेळके यांच्या समवेत जिल्हा परिषद सदस्य अनंता पावशे , संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष नारायण ठाकर, उद्योजक अनिल मालपोटे मा.चेअरमन नारायण मालपोटे, सचिन असवले, विक्रम हेमाडे,लहु वाडेकर, आंदर मावळ राष्ट्रवादी युवक अध्यक्ष भारत आडिवळे, टाकवे शहर अध्यक्ष बाबुशेठ ओसवाल, उद्योजक शिवाजी म्हसे,ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ असवले विश्वनाथ असवले,अजित कडु,यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थितीत होतें.


