“पाणी नाही, मग कर कुठल्या कामाचा?” — वडगावच्या पाणीटंचाईवर भाजपचे नगरसेवक विशाल वहीले आक्रमक; प्रशासनाला धारेवर धरले

वडगाव मावळ – वडगाव शहरातील दिवसेंदिवस गंभीर होत चाललेल्या पाणीटंचाईच्या प्रश्नावर नागरिकांचा संताप अखेर रस्त्यावर उतरला असून, याच पार्श्वभूमीवर आज वडगाव नगरपंचायत कार्यालयात पाणीपुरवठा समस्येबाबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीपूर्वी संतप्त नागरिकांनी नगरपंचायत कार्यालयावर शांततामय मोर्चा काढत प्रशासनाच्या निष्क्रिय कारभाराविरोधात जोरदार निषेध नोंदविला.
शहरातील अनेक प्रभागांमध्ये नियमित व पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत कोणतीही ठोस सुधारणा होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला. “कर भरतो आम्ही, पण पाणी मागितले की आश्वासनांचा पाऊस पडतो,” अशा तीव्र शब्दांत नागरिकांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली.
बैठकीत नागरिकांनी प्रत्येक घरापर्यंत नियमित, पुरेसा आणि स्वच्छ पाणीपुरवठा करण्याची ठाम मागणी केली. वाढत्या उष्णतेमुळे अनेक भागांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना विशेषतः मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे यावेळी निदर्शनास आणून देण्यात आले.
या आंदोलनात विरोधी पक्ष नेत्या नगरसेविका अर्चनाताई संतोष म्हाळसकर, भाजपचे आक्रमक नगरसेवक विशाल वहीले तसेच नगरसेविका सारिकाताई प्रशांत चव्हाण यांनी नागरिकांच्या वतीने प्रशासनाला जाब विचारला. पाणीप्रश्नावर प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांची उदासीनता असह्य असल्याचे सांगत नगरसेवक विशाल वहीले यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. “नागरिकांना पाणी देण्यात अपयश आले असेल तर प्रशासनाने जबाबदारी स्वीकारली पाहिजे. पाणी हा जनतेचा मूलभूत अधिकार आहे, उपकार नाहीत,” असे स्पष्ट शब्दांत त्यांनी सुनावले.
मोर्चादरम्यान संतप्त नागरिकांनी नगरपंचायतीच्या मुख्य प्रवेशद्वाराला प्रतीकात्मक टाळे ठोकून निषेध नोंदविला. विशेष म्हणजे या महत्त्वाच्या बैठकीस नगराध्यक्षा अनुपस्थित राहिल्याने नागरिकांचा रोष आणखी वाढला. उपस्थितांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत लोकप्रतिनिधींनी जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करू नये, अशी मागणी केली.
भाजपच्या नगरसेवकांनीही प्रशासन व सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरत पाणीपुरवठा व्यवस्थेतील त्रुटींवर कठोर शब्दांत टीका केली. केवळ बैठका आणि आश्वासने नकोत, तर प्रत्यक्ष कृती हवी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
नागरिकांच्या आक्रमक भूमिकेनंतर मुख्याधिकारी प्रवीण निकम आणि उपनगराध्यक्ष तथा पाणीपुरवठा सभापती सुनील ढोरे यांनी परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत ज्या भागांमध्ये पाणीटंचाई अधिक गंभीर आहे, तेथे तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येईल, असे आश्वासन दिले. तसेच शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने हाती घेण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
या प्रसंगी नगरसेवक अजय म्हाळसकर, गणेश म्हाळसकर, पंढरीनाथ ढोरे, नागरिक अतुल राऊत, शिवाजी घारे, नगरपंचायत कर्मचारी, अधिकारी व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान, “जनतेच्या मूलभूत हक्कांसाठी आमचा संघर्ष सुरूच राहील. वडगाव शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत नागरिकांच्या न्याय्य हक्कासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल,” अशी ठाम भूमिका लोकप्रतिनिधींनी बैठकीनंतर व्यक्त केली.
एकीकडे पावसाळा तोंडावर आला असतानाही वडगावकरांना पाण्यासाठी झगडावे लागत असल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आता आश्वासनांनंतर प्रत्यक्ष कृती होते का याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.



