“एक झुंज वादळाशी…” ऐतिहासिक महानाट्याने टाकवे बुद्रुकमध्ये रंगली धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सवाची दिमाखदार पर्वणी

टाकवे बुद्रुक : धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज जयंती उत्सवानिमित्त टाकवे बुद्रुक ग्रामस्थ व पंचक्रोशीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य ऐतिहासिक महानाट्य “एक झुंज वादळाशी…” या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महाराष्ट्राच्या पराक्रमी इतिहासाचे जिवंत दर्शन घडविणाऱ्या या नेत्रदीपक प्रयोगाने उपस्थितांच्या अंगावर अक्षरशः शहारे आणले.
अमित देशमुख क्रिएशन प्रस्तुत या महानाट्यात तब्बल २० दमदार कलाकारांनी प्रभावी अभिनय साकारत छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य, त्याग आणि धर्मरक्षणाच्या इतिहासाला उजाळा दिला. रणधुमाळी, भावनिक प्रसंग, संवादफेक आणि आकर्षक प्रकाशयोजनांमुळे संपूर्ण परिसर शिवमय वातावरणाने भारावून गेला होता.
तत्पूर्वी छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीला मावळातील गड किल्ल्यांवरील पाण्याने जलाभिषेक घालून विधिवत पूजा सरपंच संध्या असवले व दत्तात्रय असवले यांच्या हस्ते संपन्न झाली तसेच
जयंतीनिमित्त दहावी बारावी तील उत्तीर्ण विद्यार्थ्यांनचा सन्मान करण्यात आला तसेच नुकत्याच पोलीस भरती झालेल्या विद्यार्थ्यांनचा देखील उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला
टाकवे बुद्रुक व पंचक्रोशीतील नागरिक, युवक व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने कार्यक्रमाला उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले. धर्मवीर संभाजी महाराजांच्या इतिहासाचे जतन आणि नव्या पिढीपर्यंत प्रेरणादायी वारसा पोहोचविण्याचे महत्त्व या उपक्रमातून अधोरेखित झाले.


