टाकवे बुद्रुकमध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य ऐतिहासिक नाट्यप्रयोगाचे आयोजन

टाकवे बुद्रुक (ता. मावळ) : टाकवे ग्रामस्थ व पंचक्रोशीच्या वतीने स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त यंदा पाचव्या वर्षी भव्य ऐतिहासिक नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या आणि मराठ्यांच्या देदीप्यमान इतिहासाची गाथा उलगडणारे “एक झुंज वादळाशी” हे दोन अंकी तडाखेबंद नाटक गुरुवार, दि. १४ मे २०२६ रोजी रात्री ८ वाजता टाकवे बुद्रुक येथील पवना सहकारी बँकेच्या समोर रंगणार आहे.
या नाट्यप्रयोगामध्ये तब्बल ३० दमदार कलाकार आपल्या प्रभावी अभिनयातून छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य, त्याग आणि स्वराज्यनिष्ठेचा इतिहास जिवंत करणार आहेत. लेखक व दिग्दर्शक अमित मोहनराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सादर होणाऱ्या या नाटकाची परिसरात उत्सुकता निर्माण झाली आहे.
कार्यक्रमाचे आयोजन समर्थ शिवशंभू भक्त व टाकवे बुद्रुक ग्रामस्थ (आंदर मावळ) यांच्या वतीने करण्यात आले असून, इतिहासप्रेमी नागरिकांसाठी प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आला आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांचे स्मरण करत इतिहासातून प्रेरणा घेण्याची संधी या निमित्ताने नागरिकांना मिळणार आहे.
या ऐतिहासिक सोहळ्यास पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.


