शतकभर भारुडाच्या सेवेने उजळलेली परंपरा; पवळेवाडीतील श्रीराम कलापथक मंडळाचा शताब्दी सोहळा सोमवारी

टाकवे बुद्रुक (ता. मावळ) – गावागावांत फिरत भारुडाच्या माध्यमातून समाजप्रबोधन, भक्ती आणि संस्कृतीची ज्योत अखंड तेवत ठेवणाऱ्या पवळेवाडी, केंद्र टाकवे बुद्रुक येथील श्रीराम कलापथक मंडळाच्या स्थापनेला यंदा तब्बल १०० वर्षे पूर्ण होत आहेत. एका शतकाची ही अखंड सांस्कृतिक साधना आता शताब्दी सोहळ्याच्या रूपाने इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदली जाणार असून, सोमवार दि. ११ मे २०२६ रोजी हा भव्य दिव्य सोहळा मोठ्या भक्तीमय आणि सांस्कृतिक वातावरणात पवळेवाडी गावात संपन्न होणार आहे.
आजच्या आधुनिकतेच्या लाटेत अनेक पारंपरिक कला मागे पडत असताना, श्रीराम कलापथक मंडळाने गेली शंभर वर्षे भारुडासारखी लोककला जिवंत ठेवण्याचे अनमोल कार्य केले आहे. पुणे जिल्ह्यातील असंख्य गावांमध्ये जाऊन या मंडळाने भारुड, भजन, आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून समाजमन प्रबुद्ध केले. संत परंपरेतील विचार, अध्यात्म, सामाजिक संदेश आणि लोकजीवनातील वास्तव यांची सांगड घालत या कलापथकाने केवळ मनोरंजन नाही, तर समाजजागृतीचेही मोठे कार्य उभे केले आहे.
ग्रामीण संस्कृतीचा आत्मा जपणाऱ्या या कलापथकाचा शताब्दी सोहळा म्हणजे केवळ उत्सव नसून, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे चालत आलेल्या सांस्कृतिक वारशाचा गौरव सोहळा ठरणार आहे. गावातील ज्येष्ठ कलाकारांनी आयुष्यभर जपलेली ही कला आजही नव्या पिढीपर्यंत पोहोचत असल्याने ग्रामस्थांमध्ये अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सोहळ्याची सुरुवात पहाटे काकडा आरतीने होणार असून सकाळी अभिषेक, दुपारी श्रींच्या मिरवणुकीचा कार्यक्रम पार पडणार आहे. सायंकाळी ह.भ.प. जरेश महाराज भागवत यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले असून विविध मान्यवर आणि कलाकारांचा सत्कारही करण्यात येणार आहे. रात्री उशिरापर्यंत रंगणाऱ्या भजनाच्या कार्यक्रमाने भक्ती आणि संस्कृतीची अविस्मरणीय मेजवानी अनुभवायला मिळणार आहे.
या ऐतिहासिक शताब्दी सोहळ्यास सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय आणि धार्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. प्रमुख उपस्थितीत सांस्कृतिक संचालनालय महाराष्ट्र राज्याचे संचालक मा. श्री. विनिष्पाणी चव्हाण, खासदार श्रीरंग बारणे,आमदार सुनील शेळके, माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे, राष्ट्र अध्यक्ष रमेशभाऊ सावळे, राष्ट्रीय भारुड कलाकार श्रीमती चंद्राताई तिवडी, , अध्यक्ष तमाशा मंडळ रघुवीर खेडकर तसेच अध्यक्ष तमाशा मंडळ संग्रामराजे जाधव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
“शंभर वर्षे भारुडाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाची सेवा करणाऱ्या कलाकारांचा हा सन्मान आहे. ही परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे हीच खरी शताब्दी सोहळ्याची प्रेरणा आहे,” अशी भावना ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.
या कार्यक्रमास परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थितीत राहावे असे आवाहन श्रीराम कलापथकाचे अध्यक्ष गोपाळ पवळे, उपाध्यक्ष हरिभाऊ पवळे व मंडळाच्या सदस्यांनी केले आहे.


