इंद्रायणी नदीवर ‘विसर्जन घाट’ बांधण्याची मागणी; उपतालुकाप्रमुख सोमनाथ कोंढे यांची खासदारांना मागणी

मावळ (प्रतिनिधी): आंदर मावळ भागातील महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या टाकवे बुद्रुक आणि कान्हे परिसरातील नागरिकांची अनेक वर्षांपासूनची गैरसोय दूर करण्यासाठी आता शिवसेनेतर्फे पुढाकार घेण्यात आला आहे. इंद्रायणी नदीच्या तीरावर सुसज्ज ‘विसर्जन घाट’ बांधण्यात यावा, या मागणीचे निवेदन शिवसेना (शिंदे गट) मावळ उपतालुकाप्रमुख श्री. सोमनाथ बबन कोंढे यांनी खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांना दिले आहे.
• काय आहे मुख्य अडचण ?
टाकवे बुद्रुक आणि कान्हे ही गावे परिसरातील मोठी केंद्र आहेत. प्रतिवर्षी गणेशोत्सवामध्ये घरातील घरगुती गणपती आणि सार्वजनिक मंडळांच्या मूर्ती विसर्जनासाठी मोठ्या संख्येने नागरिक इंद्रायणी नदीच्या पात्रावर येतात. मात्र, सध्या ज्या ठिकाणी विसर्जन केले जाते, ती जागा अत्यंत अरुंद आणि निसरडी आहे. विसर्जनावेळी भाविकांना आणि कार्यकर्त्यांना जीव धोक्यात घालून पाण्यात उतरावे लागते, ज्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
• सुशोभीकरणावर भर
सोमनाथ कोंढे यांनी निवेदनात नमूद केले आहे की, या ठिकाणी पक्का विसर्जन घाट बांधल्यास केवळ नागरिकांची सोयच होईल असे नाही, तर इंद्रायणी नदी परिसराचे सुशोभीकरण होण्यासही मोठी मदत होईल. यामुळे आंदर मावळच्या सौंदर्यात अधिक भर पडणार आहे.
“स्थानिक नागरिकांची ही मागणी रास्त असून, भाविकांच्या सुरक्षेचा आणि श्रद्धेचा हा प्रश्न आहे.संसदरत्न खासदार श्रीरंग बारणे या विषयाचे गांभीर्य लक्षात आणून दिले असून तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा, अशी आमची विनंती आहे.”– सोमनाथ बबन कोंढे (उपतालुकाप्रमुख, मावळ)



