आंदोलन

अनुसूचित जाती उपवर्गीकरणाला तीव्र विरोध; पुण्यात राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा मोर्चा

.

Spread the love

पुणे, प्रतिनिधी : अनुसूचित जातींमधील अ, ब, क, ड उपवर्गीकरण रद्द करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने पुण्यात भव्य मोर्चा काढण्यात आला. हे उपवर्गीकरण मागासवर्गीय समाजामध्ये तेढ निर्माण करणारे असून आरक्षणाच्या मूळ उद्देशालाच बाधा आणणारे आहे, असे मत महासंघाचे राष्ट्रीय महासचिव तथा चर्मोद्योग विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे यांनी व्यक्त केले.

क्रांतीकारक नेते बबनराव घोलप यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर एकाच वेळी मोर्चांचे आयोजन करण्यात आले होते. त्याच पार्श्वभूमीवर पुण्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात पुणे जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील पदाधिकारी, पिंपरी-चिंचवड व पुणे शहरातील कार्यकर्ते तसेच विविध समविचारी संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मोर्चादरम्यान कार्यकर्त्यांनी उपवर्गीकरणाविरोधात जोरदार घोषणा देत विविध फलक आणि बॅनर्सद्वारे आपला निषेध व्यक्त केला. उन्हाच्या तडाख्यातही कार्यकर्त्यांचा उत्साह कायम दिसून आला.

या वेळी मोर्चाचे निमंत्रक अ‍ॅड. आनंद गवळी, राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा. शशिकांत सोनवणे, प्रा. हरीश पाचकोरे, प्रदेश युवक अध्यक्ष रवींद्र खैरे, प्रदेश उपाध्यक्ष अंकुश आंबेकर, दिनेश जाधव, प्रदेश संघटक सचिव प्रा. दत्तात्रय शिंदे यांनी मनोगत व्यक्त करत उपवर्गीकरण तात्काळ रद्द करण्याची मागणी केली.

मोर्चात राष्ट्रीय उपाध्यक्ष सुदाम लोखंडे, प्रदेश उपाध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे, सुदाम कांबळे, अनिल गायकवाड, अभिमन्यू तीखे, ज्ञानोबा हराळे, संजय लोकापुरे, पुणे शहराध्यक्ष संतोष टोणपे, उपाध्यक्ष विलास चव्हाण, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष संतोष वाघमारे, युवक अध्यक्ष रामेश्वर पाचारे, रमेश मानकर,रमेश शिंदे, ज्ञानदेव कदम, राजाराम जाधव, आनंद शिंदे,अशोक शिंदे, गुंडाजी गायकवाड, नामदेव शिंदे, विलास मानकर,अमोल मानकर, शिवाजी शिंदे यासह पुणे पिंपरी चिंचवड मावळ तालुक्यातील असंख्य समाज उपस्थितीत होते

याशिवाय गोल्डन ग्रुप, संत रोहिदास धाम (कात्रज) आणि इतर संस्थांचे प्रतिनिधीही मोठ्या संख्येने सहभागी झाले एकूणच, उपवर्गीकरणाच्या विरोधात समाजातील मोठा वर्ग एकवटल्याचे या मोर्चातून स्पष्ट झाले असून, शासनाने ही मागणी गांभीर्याने घ्यावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

 

समाज बांधवांच्या प्रतिक्रिया :

🔹 अंकुश आंबेकर (प्रदेश उपाध्यक्ष)
“अनुसूचित जातींमध्ये अ, ब, क, ड असे उपवर्गीकरण केल्यामुळे समाजात फूट पडत आहे. आम्ही एकत्र राहूनच सामाजिक आणि शैक्षणिक प्रगती साधू शकतो. त्यामुळे हे वर्गीकरण तात्काळ रद्द करणे गरजेचे आहे.”

🔹 रामेश्वर पाचारे (युवक अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड) :
“युवकांच्या भवितव्याशी संबंधित असलेला हा प्रश्न आहे. उपवर्गीकरणामुळे अनेकांना आरक्षणाच्या संधींपासून वंचित राहावे लागते. शासनाने हा अन्याय थांबवून सर्वांसाठी समान संधी निर्माण कराव्यात.”

🔹 भाऊसाहेब कांबळे (बारामती तालुका अध्यक्ष) :
“समाजात भेद निर्माण करणारे कोणतेही धोरण आम्हाला मान्य नाही. उपवर्गीकरणामुळे सामाजिक ऐक्य धोक्यात येत आहे. त्यामुळे एकसंघ समाजासाठी हे निर्णय मागे घ्यावेत.”

🔹 विष्णू सातपुते (गटई शहर अध्यक्ष) :
“आमचा संघर्ष हा अधिकारांसाठी आहे. उपवर्गीकरणामुळे मूळ आरक्षणाच्या तत्वालाच धक्का बसतो. शासनाने आमच्या मागणीकडे तातडीने लक्ष देऊन योग्य निर्णय घ्यावा.”

🔹  दिनेश जाधव (प्रदेश उपाध्यक्ष)
“मोर्चात सहभागी झालेल्या प्रत्येक समाज बांधवामध्ये प्रचंड असंतोष आहे. हा आवाज शासनापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. उपवर्गीकरण रद्द होईपर्यंत आमचा लढा सुरूच राहील.”

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button