टाकवे बुद्रुक ग्रामसभेत मतदार स्थलांतर यादीचे वाचन; ३०० हून अधिक नावे निष्पन्न

टाकवे बुद्रुक – केंद्रीय निवडणूक आयोगाच्या ‘एसआरआय’ (SRI) विशेष मोहिमेअंतर्गत टाकवे बुद्रुक येथे आयोजित ग्रामसभेत गावातील स्थलांतरित मतदारांची यादी जाहीरपणे वाचून दाखवण्यात आली. मतदान यादी शुद्धीकरण आणि पारदर्शकता राखण्याच्या उद्देशाने घेण्यात आलेल्या या ग्रामसभेत तब्बल ३०० हून अधिक मतदार गावातून स्थलांतरित झाल्याचे समोर आले.
निवडणूक आयोगाकडून सध्या राज्यभर मतदार याद्यांचे विशेष पुनरीक्षण अभियान राबविण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून टाकवे बुद्रुक येथे ही विशेष ग्रामसभा पार पडली. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्या माध्यमातून गावातील स्थलांतरित मतदारांची यादी ग्रामस्थांसमोर वाचण्यात आली. रोजगार, शिक्षण, विवाह किंवा इतर कारणांमुळे अनेक नागरिक कायमस्वरूपी गावाबाहेर राहत असून, त्यांची नावे अद्याप मतदार यादीत असल्याचे या प्रक्रियेत निदर्शनास आले.
या ग्रामसभेस तलाठी भारती बारहाते, ग्रामसेवक आप्पा भानुवसे, प्रशासक तथा सरपंच संध्या असवले, पोलीस पाटील अतुल असवले, कोतवाल बाबाजी असवले,यांच्यासह महसूल विभागाचे कर्मचारी, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रशासनाकडून मतदार यादी अद्ययावत ठेवण्याचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले. स्थलांतरित मतदारांची नावे नियमानुसार वगळणे अथवा आवश्यक ते बदल करण्याची पुढील प्रक्रिया पार पाडली जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
दरम्यान, यादी वाचनावेळी काही ग्रामस्थ व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी हरकती व सूचना नोंदवल्या. संबंधित बाबींची प्रशासनाकडून पडताळणी करून आवश्यक ती कार्यवाही केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.


