बाळराजे असवले इंग्लिश मिडियम स्कूलचा दहावीला सलग आठव्या वर्षी शंभर टक्के निकाल

टाकवे बुद्रुक : राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बाळराजे असवले इंग्लिश मिडियम स्कूल आणि सरपंच चिंधू मारुती असवले इंग्लिश मिडियम हायस्कूल, टाकवे बुद्रुक यांनी यंदाही इयत्ता दहावीच्या परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. सलग आठव्या वर्षी शंभर टक्के निकाल लागल्याने संस्था, शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
आंदर मावळ परिसरातील इंग्रजी माध्यमातील पहिली शाळा म्हणून ओळख असलेल्या या संस्थेत ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गेल्या आठ बॅचपासून शाळेने शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली असून, या संस्थेतून घडलेले अनेक विद्यार्थी आज वकील, डॉक्टर, इंजिनिअर यांसारख्या विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत.
यंदाच्या दहावी परीक्षेत प्रतीक्षा दत्तात्रय आंबेकर हिने ९०.६० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. प्रतीक सूर्यकांत तळपे याने ८५ टक्के गुणांसह द्वितीय, तर विराज तानाजी असवले याने ८३.८० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळविला.
या यशासाठी शाळेचे मुख्याध्यापक राज कांबळे, उपमुख्याध्यापिका प्रियांका कुडे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी असवले, सचिव रामदास वाडेकर, उपाध्यक्ष मनोज जैन, खजिनदार तानाजी असवले तसेच संचालक स्वामी जगताप, पांडुरंग मोडवे, राज खांडभोर, भूषण असवले, अतिश परदेशी, सोमनाथ असवले आणि दत्ता गायकवाड यांनी यशस्वी विद्यार्थी, शिक्षक व पालकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


