राजकीय

टाकवे ग्रामपंचायतीच्या सदस्य आरक्षणाची सोडत शुक्रवारी; ओबीसी जागांमध्ये घट होण्याची शक्यता

Spread the love

टाकवे बुद्रुक (प्रतिनिधी): आगामी ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने विशेष ग्रामसभा बोलावण्यात आली असून, या ग्रामसभेत ग्रामपंचायत सदस्यांच्या अंतिम आरक्षणाची घोषणा करण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवार आणि ग्रामस्थांचे लक्ष आता शुक्रवारी होणाऱ्या आरक्षण सोडतीकडे लागले आहे.

टाकवे ग्रामपंचायतीमध्ये एकूण १३ सदस्यांची निवड होणार असून, याशिवाय सरपंचाची निवड थेट जनतेमधून केली जाणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीची एकूण सदस्यसंख्या १४ इतकी राहणार आहे. राज्य शासनाच्या धोरणानुसार महिलांसाठी ५० टक्के आरक्षणाची अट कायम असल्याने यंदाही ग्रामपंचायतीत महिला सदस्यांचे प्रमाण अधिक राहणार असल्याचे चित्र आहे.

यावेळी आरक्षणाच्या फेररचनेमुळे इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) सदस्यांच्या जागांमध्ये घट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मागील निवडणुकीत ओबीसी प्रवर्गासाठी चार सदस्य जागा राखीव होत्या. मात्र, यंदा त्या तीनवर येण्याची शक्यता असून, एक जागा कमी होणार असल्याचे प्राथमिक संकेत आहेत.

घटणारी किंवा वाढणारी जागा पुरुषांसाठी राखीव राहणार की महिलांसाठी, याबाबतचे चित्र मात्र अंतिम आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे विविध प्रवर्गांतील संभाव्य उमेदवारांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून, आरक्षण जाहीर झाल्यानंतरच निवडणुकीच्या समीकरणांना वेग येणार आहे.

शुक्रवारी होणाऱ्या विशेष ग्रामसभेत वार्डनिहाय सदस्यांचे आरक्षण निश्चित करण्यात येणार असल्याने ग्रामपंचायत निवडणुकीच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. आरक्षणाच्या अंतिम घोषणेनंतर इच्छुक उमेदवारांकडून निवडणूक तयारीला अधिक गती मिळण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button