स्वीकृत नगरसेवक पदासाठी अर्जास मुदतवाढ देण्याची मागणी
सुट्ट्यांमुळे कागदपत्रांसाठी कमी वेळ; प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा

पिंपरी-चिंचवड : प्रतिनिधी – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदांसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख २ मार्च २०२६ जाहीर करण्यात आली आहे. मात्र २८ फेब्रुवारीला शनिवार व त्यानंतर रविवारची सुट्टी येत असल्याने इच्छुक उमेदवारांना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी अत्यल्प कालावधी मिळत असल्याची तक्रार पुढे आली आहे. त्यामुळे अर्ज प्रक्रियेस मुदतवाढ देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर, वकील तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रशासनाकडे यासंदर्भात निवेदन देण्याची तयारी दर्शवली आहे. कमी वेळेमुळे आवश्यक दाखले, शिफारसी व अन्य कागदपत्रे गोळा करताना मोठी धावपळ करावी लागत असून अनेक इच्छुक उमेदवार अडचणीत सापडत असल्याचे सांगितले जात आहे.
भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सचिन काळभोर यांनीही महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे. समाजातील सर्व घटकांना समान संधी मिळावी आणि पात्र उमेदवारांना पुरेसा वेळ उपलब्ध व्हावा, यासाठी प्रशासनाने तात्काळ निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.या मागणीवर प्रशासन काय निर्णय घेते, याकडे इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागले आहे.



