गॅस टंचाईचा फटका; हॉटेल व्यावसायिकांचा आधुनिक शेगडीकडे वाढता कल

टाकवे बुद्रुक – मावळ तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात सध्या गॅस सिलिंडरचा तुटवडा तीव्रतेने जाणवत आहे. या टंचाईचा थेट परिणाम हॉटेल व्यवसायावर होत असून, दैनंदिन स्वयंपाकासाठी गॅसवर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांना आपला हॉटेल व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी विविध पर्यायांचा शोध घ्यावा लागत आहे. परिणामी, अनेक हॉटेल व्यावसायिकांनी आता इलेक्ट्रॉनिक कोळसा (इंडक्शन) शेगडीचा वापर सुरू केला आहे.
गॅस सिलिंडर वेळेवर उपलब्ध होत नसल्याने हॉटेल चालवणे कठीण बनले आहे. ग्राहकांची सततची गर्दी आणि वाढती मागणी लक्षात घेता व्यवसाय सुरळीत ठेवण्यासाठी व्यावसायिकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेतला आहे. इलेक्ट्रॉनिक शेगडीमुळे तात्पुरता दिलासा मिळत असला तरी, मोठ्या प्रमाणावर स्वयंपाक करताना वेळ आणि वीज व कोळसा खर्च वाढत असल्याचीही तक्रार व्यावसायिकांकडून केली जात आहे.
ग्रामीण भागात वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येमुळेही अडचणी निर्माण होत असून, काही ठिकाणी हॉटेल व्यवसायावर याचा विपरीत परिणाम होत आहे. “गॅस वेळेवर मिळत नसल्याने इंडक्शन शेगडी वापरणे भाग पडते. मात्र, मोठ्या प्रमाणावर स्वयंपाक करताना ती पूर्णपणे उपयोगी पडत नाही परंतु तात्पुरता दिलासा या शेगडीच्या माध्यमातून मिळत भावना हॉटेल व्यावसायिक व्यक्त करत आहेत
दरम्यान, गॅस टंचाई लवकरात लवकर दूर करून नियमित पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी हॉटेल व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे. अन्यथा, या समस्येमुळे लघु व्यवसायिकांचे आर्थिक गणित बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
“गॅस सिलिंडर वेळेवर मिळत नसल्यामुळे आमचा व्यवसाय चालवणे कठीण झाले आहे. ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी व्यावसायात सातत्याने ठेवण्यासाठी आम्हाला इलेक्ट्रॉनिक कोळसा (इंडक्शन) शेगडीचा वापर करावा लागत आहे. मात्र, त्यावर मोठ्या प्रमाणात स्वयंपाक करणे अवघड जाते आणि वीज, कोळसा खर्चही वाढतो. गॅसचा नियमित पुरवठा झाला तरच आमचा व्यवसाय पूर्ववत सुरळीत चालू शकतो,”
– चेतन लोंढे,हॉटेल व्यावसायिक



