मावळ तालुका मराठी पत्रकार संघाचे सचिव रामदास वाडेकर यांना Excellence Award 2025 ने सन्मानित
रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीच्या वतीने गौरव

टाकवे बुद्रुक – मावळ तालुका मराठी पत्रकार संघाचे सचिव व मावळ सत्यचे मुख्य संपादक रामदास वाडेकर यांना पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय आणि परिणामकारक कार्याबद्दल रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीच्या वतीने Excellence Award 2025 हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सामाजिक भान, संयम, शांत कार्यपद्धती आणि तळागाळातील समस्यांवर सातत्याने आवाज उठवत गावोगावी न्याय मिळवून देण्याचे काम त्यांनी गेल्या अनेक वर्षांत निष्ठेने केले आहे. त्याची दखल घेत हा सन्मान त्यांना प्रदान करण्यात आला.
यावेळी रोटरी ३१३१ चे प्रांतपाल संतोषजी मराठे, अशोकजी शिंदे, रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचे संस्थापक संतोषजी खांडगे, रोटरीचे अध्यक्ष प्रविण भोसले,सचिव संदिप मगर, उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, स्वामी विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कूलच्या अध्यक्षा सौ. रजनीगंधा खांडगे मॅडम यासह प्रमुख पाहुणे, विविध सामाजिक संघटना, पत्रकार बांधव उपस्थित होते. रोटरी क्लब ऑफ एमआयडीसी तळेगावचे पदाधिकारी, प्राध्यापक, उद्योजक व ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते वाडेकर यांना शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
तळागाळातील समस्यांना आवाज देणारी पत्रकारिता बातमी ही केवळ छापील शब्दांची एक ओळ नसते, ती एखाद्या व्यक्तीचे आयुष्य बदलण्याची ताकद बाळगते, हे सिद्ध करणारे नाव म्हणजे रामदास वाडेकर. विशेषतः आंदर मावळातील वाहनगाव या छोट्या गावातून पत्रकारितेची सुरवात करुन सावित्रीच्या लेकींच्या पायपीट थांबवण्यात त्यांनी केलेले कार्य हे पत्रकारितेचे समाजासाठी असलेले कर्तव्य कसे पार पाडायचे याचे उत्तम उदाहरण मानले जाते. पत्रकारिता करताना आंदर मावळातील अनेक गावांमध्ये पाणीपुरवठा नसल्याने महिलांना लांब अंतर चालावे लागायचे, अनेकदा डोंगर चढावे लागायचे. ही समस्या केवळ ओरखडून न दाखवता प्रभात, पुढारी,सकाळ व आता मावळ सत्यच्या बातम्यांद्वारे त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले, जनमत तयार केले, जनतेचा आवाज पोचवला आणि पाणीपुरवठा योजना प्रत्यक्ष सुरू करण्यास प्रशासनाला प्रवृत्त केले.या कार्यामुळे अनेक गावांची वर्षानुवर्षांची वेदना कमी झाली. त्यांच्या बातमीने झालेल्या या बदलामुळे ग्रामीण भागातील महिला अत्यंत भावूक होऊन अनेकदा सांगतात, “आमचा आवाज पहिल्यांदा कुणीतरी मनापासून ऐकला, तो म्हणजे वाडेकर !”
• पत्रकारितेतील संयम व सत्यनिष्ठेचा पक्का विश्वास वाडेकर यांच्या पत्रकारितेचा सर्वात मोठा गुण म्हणजे — आवाज वाढवून नाही, तर आवाज पोहोचवून ते लढतात.संयम, अचूकता, तथ्यांची पडताळणी, कोणतीही बाजू न घेता सत्याचा शोध, गलका न करता उपाय शोधण्याची वृत्ती ही त्यांची पत्रकारितेची ओळख आहे. बरेचदा बातमी देणे म्हणजे मुद्दा पेटवणे, संवेदनशीलता वाढवणे किंवा भावनांना हात घालणे असे मानले जाते; परंतु वाडेकर यांची शैली निर्णयकारक पत्रकारिता म्हणून ओळखली जाते. त्यांनी पाण्याच्या समस्या, आरोग्य सेवा, ग्रामपंचायत पातळीवरील विकास निधी, शेतकऱ्यांचे हक्क, रोजगार, दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या अडचणी, अशा अनेक विषयांवर प्रभावी बातमीद्वारे प्रशासनाला जबाबदार बनवून लोकांचा विश्वास जिंकला आहे.
पुरस्कार स्विकारल्यानंतर भावूक होत रामदास वाडेकर यांनी सांगितले –”ही माझी वैयक्तिक कामगिरी नाही. माझे सहकारी पत्रकार, सामाजिक बांधव आणि विश्वास ठेवणाऱ्या माझ्या वाचकवर्गाचा हा सन्मान आहे. मी केवळ माध्यम असुन आवाज तुमचा आणि त्याला दिशा देण्याचा केवळ माझा प्रामाणिक प्रयत्न आहे



