राजकीय

संघर्षाला सलाम! आमदार सुनील शेळके यांच्या विश्वासाला जनतेचा कौल; फळविक्रेत्या भाग्यश्री जगताप झाल्या नगरसेविका

Spread the love

लोणावळा –  लोकशाहीत राजाचा मुलगाच राजा होत नाही, तर सर्वसामान्यांमधील कष्टाळू व्यक्तीही लोकप्रतिनिधी होऊ शकते, हे भारतीय संविधानाचे सामर्थ्य पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. लोणावळा नगरपरिषदेच्या निवडणुकीत एका अत्यंत सामान्य आणि गरीब कुटुंबातील, फळ विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या भाग्यश्री जगताप यांनी दणदणीत विजय मिळवून इतिहास घडवला आहे.

लोणावळ्यातील आदिवासी समाजातील एका गरीब कुटुंबात राहणाऱ्या भाग्यश्री जगताप यांचा हा प्रवास कोणालाही थक्क करणारा आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी त्या वर्षानुवर्षे लोणावळ्यात पेरू विक्रीचा व्यवसाय करतात. राजकारणाचा कोणताही गंध नसलेल्या, किंवा राजकीय वारसा नसलेल्या या कुटुंबाचा संघर्ष मोठा आहे. सकाळपासून दुपारी उशिरापर्यंत डोक्यावर पेरूची टोपली घेऊन फिरणे, ग्राहकांना पेरू विकून चार पैसे गाठीला बांधणे, हा त्यांचा नित्यक्रम. मात्र, याच कष्टाळू हातांमध्ये आता लोणावळ्याच्या विकासाची लेखणी आली आहे.

मावळचे आमदार सुनील शेळके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या वतीने एका सामान्य घरातील महिलेला उमेदवारी देऊन मोठा धाडसी निर्णय घेतला होता. तिकिट मिळाल्यानंतरही जगताप यांचा संघर्ष संपला नाही. “सकाळ-दुपार पेरू विक्री करून संसाराचा गाडा हाकायचा आणि संध्याकाळी लोकांच्या दारात जाऊन प्रचार करायचा,” अशा दुहेरी कसरतीतून त्यांनी हा विजय खेचून आणला आहे. आमदार शेळके यांनी एका सामान्य कार्यकर्त्यावर टाकलेला हा विश्वास मतदारांनी सार्थ ठरवला.

हा विजय केवळ भाग्यश्री जगताप यांचा नसून, तो संविधानावर निष्ठा ठेवणाऱ्या आणि प्रामाणिक कष्ट करणाऱ्या प्रत्येक सामान्य माणसाचा विजय मानला जात आहे. आदिवासी समाजातील एका महिलेने थेट नगरपरिषदेच्या सभागृहात प्रवेश केल्याने मावळ तालुक्यात सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. लोकशाहीची खरी ताकद काय असते, याचे जिवंत उदाहरण म्हणून भाग्यश्री जगताप यांच्या विजयाकडे पाहिले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button