राजपुरी-वारंगवाडी पर्यायी रस्ता पाटबंधारे विभागाने हटवला; विद्यार्थ्यांसह कामगारांची कोंडी
नदीपात्रातील प्रवाहाचा मुद्दा: ग्रामस्थांकडून आता 'हक्काच्या' उड्डाणपुलासाठी शासनाकडे पाठपुरावा

राजपुरी (प्रतिनिधी):- राजपुरी आणि वारंगवाडी या दोन गावांना जोडणारा आणि विद्यार्थी व कामगारांसाठी सोयीचा ठरलेला नदीपात्रा लगतचा कच्चा पर्यायी रस्ता पाटबंधारे विभागाने धडक कारवाई करत हटवला आहे. नदीचा नैसर्गिक प्रवाह अडवला जात असल्याचे कारण देत प्रशासनाने हे अतिक्रमण काढले असले, तरी यामुळे ग्रामस्थांची मोठी गैरसोय झाली आहे. या कारवाईनंतर ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त करत आता या ठिकाणी शासनाने कायमस्वरूपी उड्डाणपूल उभारून द्यावा, अशी आग्रही मागणी केली आहे.
• नेमके प्रकरण काय?
राजपुरी गावातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी आणि कामगारांना वारंगवाडी येथे कामावर जाण्यासाठी जवळचा रस्ता उपलब्ध असावा, या हेतूने ग्रामस्थांनी श्रमदानातून आणि लोकसहभागातून नदीपात्राच्या लगत एक कच्चा पर्यायी रस्ता तयार केला होता. हा रस्ता दोन्ही गावांतील दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरत होता. मात्र, हा रस्ता नदीपात्रात असल्याने पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडला जात असल्याचे निदर्शनास आले. या तांत्रिक बाबीचा आधार घेत पाटबंधारे विभागाने अचानक धडक कारवाई करत हा रस्ता खोदून टाकला.
• ग्रामस्थांचा संताप आणि पुलाची मागणी
प्रशासनाच्या या कारवाईमुळे शाळकरी मुले आणि दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहेत. “रस्ता तोडल्याने आमचा हक्काचा मार्ग बंद झाला आहे,” अशी भावना व्यक्त करत ग्रामस्थांनी नाराजी दर्शवली आहे. केवळ रस्ता तोडून प्रश्न सुटणार नसून, शासनाने या ठिकाणी रीतसर उड्डाणपूल (पक्का पूल) बांधून द्यावा, जेणेकरून नदीच्या प्रवाहाला बाधा येणार नाही आणि गावकऱ्यांची सोय होईल, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
• पाठपुराव्याचा केलाय ग्रामस्थांनी निर्धार
गावाच्या हितासाठी आणि भविष्यातील सोयीसाठी हा प्रश्न शासनाकडे लावून धरण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. नवीन उड्डाणपूल मंजूर करून आणण्यासाठी पै.चंद्रकांत शिंदे, माजी उपसरपंच भाऊ शिंदे, सागर वंजारी, सागर शिंदे, आत्माराम शिंदे, राहुल लोंढे, पोलीस पाटील योगेश शिंदे, मयुर शिंदे, अविनाश शिंदे आणि किसन शिंदे यांच्यासह प्रमुख ग्रामस्थांनी एकजूट दाखवली असून, जोपर्यंत पक्का रस्ता मिळत नाही तोपर्यंत शासनाकडे सतत पाठपुरावा करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.



