विठोबाच्या नामस्मरणानेच जीवनाचे सार्थक’ – ह.भ.प. गणेश महाराज फरताळे
फळणे गावात अखंड हरिनाम सप्ताहात भक्तीमय वातावरण; 'एक गाऊ आह्मीं विठोबाचे नाम' अभंगावर सुश्राव्य निरूपण

फळणे (ता. मावळ)- “कलियुगात ईश्वराप्राप्तीसाठी नामस्मरण हे सर्वात सोपे आणि प्रभावी साधन आहे. इतर कोणत्याही कठीण साधना करण्यापेक्षा केवळ विठोबाचे नाम घेतले तरी जीवनाचे सार्थक होते,” असे प्रतिपादन ह.भ.प. गणेश महाराज फरताळे यांनी केले.
फळणे गावात सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित कीर्तन सेवेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या ‘एक गाऊ आह्मीं विठोबाचे नाम । आणिकांचे काम नाहीं आतां’ या सुप्रसिद्ध अभंगावर अतिशय रसाळ व ओघवत्या शैलीत निरूपण केले.
अभंगाचा भावार्थ उलगडून सांगताना ह.भ.प. फरताळे महाराज म्हणाले की, संतांनी परमार्थाची अवघड वाट मोडून ती सर्वसामान्यांसाठी सोपी केली आहे (मोडूनियां वाटा सूक्ष्म दुस्तर). पूर्वीच्या काळी यज्ञ, याग, तपश्चर्या करणे कठीण होते, परंतु संतांनी ‘टाळ-मृदंगाचा घोष’ आणि ‘विठोबाचे नाम’ याद्वारे ब्रह्मरस सेवनाचा सोपा मार्ग दाखवला आहे.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्यांनी पुढे सांगितले की, “तुका म्हणे महापातकी पतित, ऐसियांचे हित हेळा मात्रं” या उक्तीप्रमाणे, नामस्मरणाने मोठ्या पापांचाही नाश होतो आणि पतित जीवांचा उद्धार होतो. माणसाने संसारातील व्याप सांभाळताना भगवंताच्या नामाचा आधार सोडू नये.
यावेळी टाळ-मृदंगाचा गजर आणि ‘राम कृष्ण हरी’च्या जयघोषाने संपूर्ण मंडप दुमदुमून गेला होता. महाराजांनी दिलेल्या दृष्टान्तांनी आणि सुमधुर वाणीने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले होते. या कीर्तन सोहळ्यासाठी फळणे गावातील ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनी आणि तरुण वर्गाची मोठी उपस्थिती होती.
.



