अश्विनी कोंडे-असवले यांच्या प्रचार दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
टाकवे पंचायत समिती मतदारसंघातील सर्वच गावांमध्ये जनसंपर्काचा झंझावात
टाकवे बुद्रुक – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दारात आल्या असून निवडणुकीची तारीख जाहीर होण्याआधीच टाकवे पंचायत समिती मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर टाकवे पंचायत समिती उमेदवार अश्विनी कोंडे असवले या आपल्या मतदारसंघातील प्रत्येक गावात जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधत आहेत. त्यांच्या या जनसंपर्क दौऱ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, गावागावांत त्यांच्या समर्थनार्थ उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
रविवारी कोंडे असवले यांनी मतदारसंघातील शेवटचे टोक मानल्या जाणाऱ्या सावळा, माळेगाव खुर्द, माळेगाव बुद्रुक, पिंपरी इंगळूण, कुणे आणि अनसुटे या गावांचा दौरा करून नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या. या दौऱ्यात त्यांनी स्थानिक समस्या जाणून घेतल्या, महिलांशी संवाद साधला आणि तरुण मतदारांशी चर्चा केली. ग्रामस्थांनी त्यांच्या समोर पाणीटंचाई, रस्त्यांची दुरवस्था, रोजगाराच्या संधींचा अभाव, तसेच शैक्षणिक सुविधा यांसारख्या महत्त्वाच्या प्रश्नांची मांडणी केली.
अश्विनी कोंडे असवले यांनी ग्रामस्थांना आश्वासन दिले की, “टाकवे पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास घडविण्यासाठी मी पूर्ण ताकदीनिशी काम करणार आहे. जनतेच्या अडचणी केवळ ऐकण्यासाठी नव्हे, तर त्या सोडवण्यासाठीच आम्ही या निवडणुकीच्या मैदानात उतरलो आहोत.”
त्या पुढे म्हणाल्या की, “आज मतदारांचा विश्वास आणि सहभाग हेच माझे बळ आहे. गावागावातील महिलांच्या स्वावलंबनासाठी, शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आणि युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही ठोस योजना राबविणार आहोत.”
प्रचार दौऱ्यादरम्यान स्थानिक नागरिक, महिलांचे बचतगट, शेतकरी आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रत्येक गावात कोंडे असवले यांचे स्वागत फुलांच्या हारांनी आणि घोषणांनी करण्यात आले. अनेक ठिकाणी महिलांनी आरती करून त्यांच्या प्रचाराचे स्वागत केले. ग्रामीण भागातील वृद्ध नागरिकांनी त्यांच्याशी संवाद साधत स्थानिक प्रश्न मांडले.
या दौऱ्यात त्यांच्यासोबत स्थानिक कार्यकर्ते, ग्रामपंचायत सदस्य आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावागावांतून मिळणारा प्रतिसाद पाहता, कोंडे असवले यांच्या प्रचाराची लाट मतदारसंघात अधिक वेगाने पसरत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
मतदारसंघातील नागरिकांशी आत्मीयतेने संवाद साधत, त्यांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेण्याच्या पद्धतीमुळे अश्विनी कोंडे असवले यांचा दौरा केवळ राजकीय नव्हे तर सामाजिक बंध मजबूत करणारा ठरत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा संपर्क दौरा मतदारांमध्ये उत्सुकतेचा आणि चर्चेचा विषय ठरत आहे.



