
मुंबई (प्रतिनिधी) : चर्मकार गटई कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे मुंबई सुधार समिती अध्यक्षा संध्या दोशी-सक्रे यांना निवेदन सादर करण्यात आले. बुधवार, ८ एप्रिल २०२६ रोजी त्यांच्या कार्यालयात आयोजित बैठकीत हा विषय सविस्तर मांडण्यात आला.
राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव (नाना) घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली, राष्ट्रीय सल्लागार पंढरीनाथ पवार, राष्ट्रीय महिला अध्यक्षा सरोज बिसुरे तसेच प्रदेशाध्यक्ष डॉ. शांताराम कारंडे यांच्या नेतृत्वात ही बैठक पार पडली.
या बैठकीस मुंबई अध्यक्ष जगन्नाथ वाघमारे, दादाभाऊ माने, श्रीधर ठोंबरे, मुंबई गटई अध्यक्ष बाळू अहिरे, उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष बाबू गोरे तसेच मुंबई प्रभारी राजन पोटे यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान चर्मकार गटई कामगारांच्या अडचणी, रोजगार सुरक्षितता, जागा उपलब्धता आणि सामाजिक संरक्षण यांसारख्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी अध्यक्षा संध्या दोशी-सक्रे यांनी सकारात्मक भूमिका घेत लवकरच महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले.
दरम्यान, मागण्या मान्य न झाल्यास चर्मकार बांधवांच्या हक्कांसाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रीय महिला अध्यक्षा सरोज बिसुरे यांनी दिला. या बैठकीमुळे चर्मकार गटई कामगारांच्या प्रश्नांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



