गुन्हेगारी

टाकवेतील सोएक्स कंपनीवर एफडीएची ऐतिहासिक कारवाई; ३१ कोटींचा प्रतिबंधित हुक्का तंबाखूचा साठा जप्त

Spread the love

टाकवे बुद्रुक – मावळ तालुक्यातील औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या टाकवे बुद्रुक गावात अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि अन्न सुरक्षा विभागाने आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. या धडाकेबाज कारवाईत प्रशासनाने तब्बल ३१ कोटी ६७ लाख रुपये किमतीचा आरोग्यास घातक असलेला प्रतिबंधित हुक्का आणि तंबाखूचा साठा जप्त केला आहे. या कारवाईमुळे केवळ मावळातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

प्रशासनाला गोपनीय सूत्रांकडून माहिती मिळाली होती की, टाकवे येथील ‘मे. सोएक्स इंडिया प्रा. लि.’ या कंपनीच्या गोडाऊनमध्ये अवैध आणि प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची साठवणूक केली जात आहे. या माहितीची खातरजमा केल्यानंतर, अन्न व औषध प्रशासन आणि अन्न सुरक्षा विभागाच्या पथकाने संयुक्तरीत्या छापा टाकला. या तपासणीत अधिकाऱ्यांना धक्कादायक बाबी आढळून आल्या. गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणावर तयार आणि कच्च्या मालाचा साठा लपवून ठेवण्यात आला होता.

जप्त केलेला साठा आणि त्याचे स्वरूप या कारवाईत प्रामुख्याने तरुणाईला व्यसनाच्या जाळ्यात ओढणाऱ्या ‘अफजल सिंथेटिक फ्लेवर्ड हुक्का’ (Afzal Synthetic Flavored Hookah) आणि ‘सोएक्स सिंथेटिक हर्बल हुक्का’ (Soex Synthetic Herbal Hookah) या ब्रँड्सचा समावेश आढळुन आला आहे.

 यामध्ये एकूण जप्त साठा: ५४८.४८८ किलो मालाची किंमत ३१ कोटी ६७ लाख रुपये आहे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आणि अवैध विक्रीमध्ये या साठ्याची किंमत प्रचंड असल्याने हे रॅकेट किती मोठे असावे, याचा अंदाज येतो. हा सर्व माल सार्वजनिक आरोग्यास अत्यंत धोकादायक असल्याने प्रशासनाने तत्काळ संबंधित गोडाऊन सील केले असून उत्पादनांच्या विक्रीवर बंदी घातली आहे.

या गंभीर प्रकरणी वडगाव पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. गुन्ह्यात खालील आरोपींचा समावेश आहे:

१. अनिल कुमार चव्हाण (सहाय्यक व्यवस्थापक) – याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

२. फैजल फजलानी

३. आसीफ फजलानी

४. मे. सोएक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (कंपनी)

५. मे. सोएक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड निर्मल

वडगाव पोलिसांनी कंपनीचा सहाय्यक व्यवस्थापक अनिल कुमार चव्हाण याला अटक केली असून, कंपनीच्या मालकांचा आणि इतर आरोपींचा शोध सुरू आहे. हा ३१ कोटींचा साठा नेमका कोठे वितरित केला जाणार होता? याचे तार आंतरराष्ट्रीय रॅकेटशी जुळलेले आहेत का? याचा सखोल तपास आता पोलीस करत आहेत. मानवी आरोग्याशी खेळणाऱ्या अशा कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता मावळवासियांनी लावून धरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button