पाच वर्षांच्या प्रामाणिक कार्याची ग्रामसभेत पोचपावती; ग्रामपंचायत सदस्य विश्वनाथ जाधव यांचा ग्रामस्थांकडून सन्मान
.

कशाळ (मावळ) : पद हे केवळ अधिकाराचे नसून जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्याची जबाबदारी असते, या भावनेतून गेली पाच वर्षे ग्रामपंचायत सदस्य म्हणून प्रामाणिकपणे काम करणारे विश्वनाथ जाधव यांच्या विकासाभिमुख कार्याची ग्रामस्थांनी दखल घेतली. आज झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. या सन्मानामुळे पाच वर्षांच्या कार्याची जणू ग्रामस्थांकडून पोचपावतीच मिळाल्याची भावना जाधव यांनी व्यक्त केली.
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी जाधव यांनी आपल्या कार्यकाळात विविध विकासकामांसाठी सातत्याने पाठपुरावा केला. रस्ते, सौरदिवे, शौचालये, निवारा शेड, स्मशानभूमी विकास, पाण्याच्या टाक्या, वृक्षारोपण यांसह विविध सार्वजनिक सुविधांच्या कामांना त्यांनी प्राधान्य दिले.
याशिवाय शेतकरी आणि गरजू कुटुंबांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले. शेतकऱ्यांसाठी गोठे, गरजू लाभार्थ्यांना घरकुल तसेच विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. शासनाच्या योजना कागदावर न राहता त्या प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचाव्यात, यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केल्याचे ग्रामस्थांनी यावेळी नमूद केले.
या कामात ग्रामसेविका पूजाताई तसेच ग्रामरोजगार सेवक सखाराम खामकर यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे विश्वनाथ जाधव यांनी सांगितले. विकासकामे ही कोणत्याही एका व्यक्तीची नसून ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्या समन्वयातून साकारत असतात, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली.
सन्मानाला उत्तर देताना जाधव म्हणाले, “जनता पदावर बसवते आणि जाबही विचारते, हे गेल्या पाच वर्षांत प्रकर्षाने अनुभवले. आज ग्रामस्थांनी माझ्या कामाची दखल घेऊन केलेला सन्मान ही माझ्यासाठी मोठी प्रेरणा आहे. हा सन्मान माझ्या एकट्याचा नसून माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक ग्रामस्थाचा आहे. भविष्यातही गावाच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करत राहणार आहे.”
ग्रामसभेत गावातील प्रमुख मंडळी, ग्रामस्थ तसेच विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकप्रतिनिधीच्या कामाची खरी पावती निवडणुकीतील मतांपेक्षा जनतेच्या मनातील विश्वास आणि ग्रामसभेतील कौतुकातून मिळते, याचा प्रत्यय या सन्मानातून समोर आला आहे.



