नवलाख उंब्रे येथे २८ डिसेबरला रंगणार ‘मावळ केसरी’ कुस्तीचा थरार; विजेत्यांना मिळणार मानाची चांदीची गदा आणि दुचाकी!

नवलाख उंब्रे-पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने आणि मावळ तालुका कुस्तीगीर संघाच्या सौजन्याने, मा. श्री. प्रशांतदादा भागवत युवा मंच आयोजित ‘मावळ केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२६’ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा रविवार, दिनांक २८ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता नवलाख उंब्रे येथील श्रीराम महाविद्यालयासमोर पार पडणार आहे.
या स्पर्धेचे मुख्य आकर्षण म्हणजे ‘मावळ केसरी’ किताबाच्या मानकरी पैलवानाला स्व. पै. नगराध्यक्ष सचिनभाऊ शेळके यांच्या स्मरणार्थ आमदार श्री. सुनील अण्णा शेळके यांच्याकडून मानाची चांदीची गदा देण्यात येणार आहे. तसेच विजेत्यांना बुलेट आणि स्कूटरसारखी आकर्षक बक्षिसे देखील देण्यात येणार आहेत.
•• स्पर्धेची ठळक वैशिष्ट्ये आणि आकर्षक बक्षिसे
* मावळ केसरी (पुरुष): मानाची चांदीची गदा आणि रॉयल एनफिल्ड बुलेट * मावळ महिला केसरी: विजेत्या महिला पैलवानास दुचाकी (स्कूटर). * कुमार गट: विजेत्यास स्प्लेंडर गाडी. * बाल गट: विजेत्यास सायकल.
वजन गट विभागणी स्पर्धा खालीलप्रमाणे विविध वयोगट आणि वजन गटांत खेळवली जाईल:
१. बाल गट (१४ वर्षांखालील): २२, २५, २८, ३२, ३५, ३८, ४२ किलो.२. कुमार गट (१७ वर्षांखालील): ४५, ५०, ५५, ६०, ६१ ते १०० किलो.३. वरिष्ठ गट: ५७, ६०, ६५, ७०, ७४ ते १२५ किलो.४. महिला गट: २५ ते ३०, ३० ते ३६, ३६ ते ४०, ४० ते ४५, ४५ ते ५०, ५० ते ७५ किलो.
कुस्तीगिरांसाठी विशेष सूचना असुन स्पर्धेत सहभागी होणाऱ्या कुस्तीगीरांनी याची नोंद घ्यावी की, बाल गट, कुमार गट आणि महिला विभागाच्या कुस्त्या मॅटवर (गादी) होणार असून, वरिष्ठ पुरुष विभागाच्या लढती मातीवर होणार आहेत. सर्व कुस्तीगीरांची वजने स्पर्धेच्या दिवशीच (२८ डिसेंबर) सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत स्पर्धेच्या ठिकाणी घेतली जातील.
या भव्य कुस्ती सोहळ्याचे निमंत्रक सौ. मेघाताई प्रशांतदादा भागवत आणि श्री. प्रशांतदादा चंद्रकांत भागवत असून, जास्तीत जास्त कुस्ती प्रेमींनी आणि नागरिकांनी या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन ‘मा. श्री. प्रशांतदादा भागवत युवा मंच’ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

