टाकवे गावची कन्या सानिका गुणाट पोलीस दलात दाखल
गावातील पहिली महिला पोलीस ठरण्याचा मान;जिद्द आणि मेहनतीचे यश

टाकवे बुद्रुक – मावळ तालुक्यातील टाकवे बुद्रुक येथील सानिका तानाजी गुणाट हिने महाराष्ट्र पोलीस दलात पुणे शहर पोलीस पदावर निवड मिळवत गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. टाकवे गावातून पोलीस सेवेत दाखल होणारी ती पहिली महिला ठरली असून, तिच्या या यशामुळे संपूर्ण परिसरात आनंद आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या सानिकाने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही हार न मानता आपल्या ध्येयाचा पाठपुरावा केला. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना तिने सातत्याने अभ्यास, शारीरिक तयारी आणि मानसिक ताकद यावर भर दिला. तिच्या चिकाटीला आणि मेहनतीला अखेर यश मिळाले.
सानिकाच्या या यशामागे ‘यशस्वी अकॅडमी तळेगाव’मधील प्रशिक्षणाचा मोठा वाटा आहे. प्रशिक्षक अनिकेत उडाफे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तिने कठोर सराव केला. तसेच, तिच्या आई-वडिलांसह कुटुंबीयांनी दिलेला पाठिंबा आणि प्रोत्साहन यामुळेच ती या टप्प्यापर्यंत पोहोचू शकली.
सानिकाचे यश हे केवळ वैयक्तिक यश नसून, ग्रामीण भागातील मुलींसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे. तिच्या या कामगिरीमुळे टाकवे गावाचे नाव उंचावले असून, अनेक तरुण-तरुणींना नव्या ध्येयांची दिशा मिळाली आहे.
दरम्यान, गावकऱ्यांकडून तसेच विविध स्तरांवरून सानिकावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.



