क्रेशर व्यवसायाला टाकवे हद्दीत विरोध; ग्रामस्थांन कडुन ग्रामसभेत एक मताने ठराव
ग्रामसभेला नागरिकांनचा मोठा प्रतिसाद सभागृह झाले हाऊसफुल्ल

टाकवे बुद्रुक – टाकवे ग्रामपंचायत हद्दीतील खाण क्रेशर व्यवसायाला ग्रामस्थांनी ठाम विरोध दर्शवित एकमताने विरोधाचा ठराव विशेष ग्रामसभेत पारित केला. शुक्रवारी ग्रामपंचायत सभागृहात झालेल्या या ग्रामसभेत गावातील महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. क्रेशर व्यवसायामुळे होणारे पर्यावरणीय नुकसान, ध्वनी व वायू प्रदूषण, तसेच ग्रामस्थांच्या आरोग्यावर होणारा परिणाम याचा सविस्तर आढावा घेत ग्रामस्थांनी भूमी, पाणी, जंगल व गावाच्या अस्तित्वासाठी हा निर्णय घेत विरोधाचा ठराव आता जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पाठविण्यात येणार आहे
ग्रामसभेत बोलताना ग्रामस्थ प्रतिनिधींनी स्पष्ट केले की, “गावातील शेतजमिनी, पाण्याची साधने आणि आजूबाजूचा पर्यावरणीय समतोल सुरक्षित ठेवणे ही प्राथमिक गरज आहे. क्रेशर व्यवसाय सुरू झाल्यास सततचा दगडफोडीचा आवाज, धूळ, कंपने, पाण्याचा वाढता वापर आणि वाहतुकीमुळे होणारा रस्त्याचा ऱ्हास याचा थेट परिणाम ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनावर होईल. त्यामुळे अशा व्यवसायाला गावात कोणत्याही परिस्थितीत परवानगी देता येणार नाही या वेळी अनेक युवकांनी संताप व्यक्त करत, क्रेशर व्यवसायामुळे त्यांच्या आरोग्याचे आणि गावाच्या भविष्याचे जतन महत्त्वाचे असल्याचे सांगितले. “उद्योग आवश्यक आहेत, पण ते पर्यावरणपूरक असायला हवेत असे मत नागरिकांनी व्यक्त केले ग्रामसभेत महिलांचा सहभाग लक्षणीय होता त्यांनी घरगुती पाण्यावर आणि दिवसभराच्या कामांवर प्रदूषणाचा होणारा परिणाम याचा अनुभव सांगत विरोध आणखी ठामपणे नोंदविला.
ग्रामपंचायतीच्या वतीने झालेल्या चर्चेनंतर ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेऊन सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि उपस्थित ग्रामस्थांनी एकमताने ठराव मंजूर केला. हा ठराव जिल्हाधिकारी कार्यालय तसेच संबंधित विभागाकडे तत्काळ पाठविण्यात येणार असून, गावाच्या मर्यादेत क्रेशर व्यवसायास कोणत्याही परिस्थितीत मंजुरी देऊ नये अशी विनंती करण्यात येणार आहे.
“टाकवे ग्रामपंचायतीने गावकऱ्यांच्या भावना आणि भविष्यातील पर्यावरणीय परिणाम लक्षात घेऊन खाण क्रेशर व्यवसायाला एकमताने विरोधाचा ठराव केला आहे. गावाची जमीन, पाणी, हवा आणि आरोग्य यांचा प्रश्न कोणत्याही विकासापेक्षा मोठा आहे. ग्रामस्थांनी दाखवलेली एकजूट कौतुकास्पद आहे. हा ठराव जिल्हाधिकारी आणि संबंधित विभागांना सादर करून क्रेशरला मंजुरी न देण्यासाठी आम्ही ठामपणे पाठपुरावा करू.”
– अविनाश असवले ,सरपंच टाकवे



