मावळ

चिमुकलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ टाकवेत मूक मोर्चा; बाजारपेठ बंद

महिला, युवकांसह ग्रामस्थांचा मोठा सहभाग; आरोपीवर कठोर कारवाई व फास्ट ट्रॅक न्यायालयाची मागणी

Spread the love

टाकवे बुद्रुक : मावळ तालुक्यातील टाकवे बुद्रुक येथे १ सप्टेंबर रोजी चिमुकलीवर झालेल्या कथित लैंगिक अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण मावळ तालुका हादरला आहे. या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी टाकवे बुद्रुक येथे नागरिकांनी एकजूट दाखवत मूक मोर्चा, निषेध सभा आणि बाजारपेठ बंद ठेवून तीव्र संताप व्यक्त केला. खंडोबा चौकात झालेल्या निषेध सभेला महिला, युवक, ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निषेध सभेनंतर टाकवे बुद्रुक येथून मूक मोर्चा काढण्यात आला. कोणतीही घोषणाबाजी न करता शांततेत निघालेल्या या मोर्चातून नागरिकांनी आपल्या संतापाला वाट करून देतानाच पीडित बालिकेला न्याय मिळवून देण्याची ठाम भूमिका व्यक्त केली. मोर्चानंतर पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

“चिमुकलीला न्याय मिळालाच पाहिजे, आरोपीवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे,” अशी एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली. आरोपीला अटक झाल्याबद्दल प्रशासनाचे आभार मानण्यात आले; मात्र केवळ अटक करून प्रकरण थांबता कामा नये. तपास वेगाने पूर्ण करून सक्षम दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करावे, अशी मागणी नागरिकांनी केली.

 

• फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालविण्याची मागणी

 

या गुन्ह्याचा तपास जलदगतीने पूर्ण करून उपलब्ध सर्व भक्कम पुरावे संकलित करावेत. आरोपीला कायद्यातील कोणतीही पळवाट मिळू नये, यासाठी तपास यंत्रणेने विशेष दक्षता घ्यावी. तसेच प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

 

पीडित बालिका आणि तिच्या कुटुंबीयांना आवश्यक कायदेशीर मदत, पोलीस संरक्षण तसेच मानसिक आधार उपलब्ध करून द्यावा, अशीही मागणी करण्यात आली. दोष सिद्ध झाल्यास आरोपीला कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा मिळावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.

• “न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहणार”

“ही केवळ एका कुटुंबाची लढाई नसून संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. बालकांच्या सुरक्षिततेशी तडजोड केली जाऊ शकत नाही. पीडित बालिकेला न्याय मिळेपर्यंत नागरिकांचा लढा सुरूच राहणार,” अशी भावना निषेध सभेत व्यक्त करण्यात आली.

दरम्यान, घटनेच्या निषेधार्थ टाकवे बुद्रुकमधील बाजारपेठही बंद ठेवण्यात आली. यावेळी देवाभाऊ गायकवाड, शिवाजी असवले, सदानंद पिलाणे,अनिल मालपोटे,मुनावर अत्तार, अंकुश आंबेकर,संध्या असवले,सुवर्णा असवले, बाळासाहेब मालपोटे,अदीनाथ जांभुळकर, अर्जुन गुणाट,अक्षय ननवरे,जितेंद्र ननवरे, यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. गावात तणाव पुर्ण वातावरण असल्याने पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button