चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेने टाकवे बुद्रुक संतप्त; आरोपीवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी शनिवारी गाव बंद व निषेध सभा
पीडितेला न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा ग्रामस्थांचा निर्धार

टाकवे बुद्रुक : टाकवे बुद्रुक गावातील निष्पाप लहान मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या धक्कादायक घटनेने संपूर्ण गाव हादरले असून, या अमानुष कृत्याविरोधात ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. पीडित चिमुकलीला तातडीने न्याय मिळावा आणि आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसाठी ग्रामस्थांनी शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ रोजी ‘गाव बंद’ची हाक दिली आहे.
या घटनेच्या निषेधार्थ सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत टाकवे बुद्रुक गाव बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. गावातील सर्व दुकानदार, व्यापारी, व्यावसायिक तसेच ग्रामस्थांनी आपापली दुकाने, आस्थापने आणि व्यवहार पूर्णपणे बंद ठेवून या निषेध आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
ग्रामस्थांनी या घटनेकडे केवळ एका कुटुंबावर ओढवलेले संकट म्हणून न पाहता, संपूर्ण गावाच्या अस्मितेला आणि मानवतेला हादरा देणारी घटना म्हणून पाहिले आहे. त्यामुळे आरोपीला कोणतीही दया न दाखवता कायद्यानुसार कठोर शिक्षा व्हावी, अशी संतप्त मागणी नागरिकांकडून होत आहे.
∆ ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या ∆
• आरोपीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
• पीडित चिमुकलीला तातडीने आणि योग्य न्याय मिळावा.
• पीडित व तिच्या कुटुंबाला आवश्यक ती सर्वतोपरी मदत व संरक्षण देण्यात यावे.
• भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी गावात प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात याव्यात.
दरम्यान, या गाव बंदच्या माध्यमातून टाकवे बुद्रुकवासीयांनी एकजुटीचा संदेश दिला असून, “अत्याचाराचा तीव्र निषेध; पीडित चिमुकलीस न्याय मिळालाच पाहिजे!” असा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.या बंदच्या हाकेला सर्वांनी शांततापूर्ण मार्गाने प्रतिसाद देऊन निष्पाप चिमुकलीच्या न्यायाच्या लढ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन समस्त ग्रामस्थ व सर्व व्यापारी संघटना, टाकवे बुद्रुक यांच्या वतीने करण्यात आले आहे.



