टाकवे बुद्रुकमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू; वॉर्डनिहाय मतदार यादी अद्ययावत, इच्छुकांच्या हालचालींना वेग
• स्थलांतरित मतदारांची नावे कमी न झाल्याने यंदाही समीकरणे गुंतागुंतीची • आपल्या वॉर्डात मतदार कायम ठेवण्यासाठी इच्छुकांमध्ये चुरस

टाकवे बुद्रुक | प्रतिनिधी – मावळ तालुक्यातील बहुचर्चित टाकवे बुद्रुक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी आता प्रत्यक्षात सुरू झाली आहे. वॉर्डनिहाय मतदार यादी अद्ययावत करण्याची प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाल्याने गावातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीच्या तयारीला वेग दिला आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणुकीचा कार्यक्रम कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता असल्याने गावातील प्रत्येक वॉर्डात राजकीय हालचाली वाढल्या आहेत.
यापूर्वी वॉर्डरचना, वॉर्डनिहाय आरक्षण आणि सरपंच पदाचे आरक्षण निश्चित झाले आहे. आता मतदार यादी अद्ययावत करण्याचाही टप्पा पूर्ण झाल्यामुळे निवडणुकीचे बिगुल लवकरच वाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांकडून मतदारांशी संपर्क, घरभेटी, बैठका, सामाजिक उपक्रम आणि विविध स्तरांवर जनसंपर्क मोहिमा सुरू करण्यात आल्या आहेत. अनेकांनी आपल्या समर्थकांची फळी मजबूत करण्यासाठी स्वतंत्र रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.
यंदाच्या निवडणुकीत स्थलांतरित मतदारांचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे. अनेक वर्षांपूर्वी गावाबाहेर स्थायिक झालेल्या मतदारांची नावे अद्याप मतदार यादीत कायम असल्याने अनेक वॉर्डांतील मतदानाची गणिते बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा मतदारांची नावे कमी होऊ नयेत, तसेच ते आपल्या वॉर्डातच कायम राहावेत यासाठी इच्छुकांकडून पडद्यामागे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा गावभर रंगू लागली आहे. काही इच्छुकांकडून या मतदारांशी थेट संपर्क साधून त्यांचा पाठिंबा मिळविण्याचे प्रयत्नही सुरू असल्याचे बोलले जात आहे.
यामुळे प्रत्येक वॉर्डातील मतदारसंख्येची बेरीज-वजाबाकी सुरू झाली असून, कोणत्या वॉर्डात किती निर्णायक मते आहेत, कोणत्या कुटुंबांचा कल कोणाकडे आहे, याचा बारकाईने अभ्यास केला जात आहे. निवडणुकीपूर्वीच राजकीय गोटांमध्ये जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाल्याने यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
गावातील कचरा प्रश्न पाणीपुरवठा,सार्वजनिक स्वच्छता,रोजगार, विकासकामे,सार्वजनिक सुविधा आणि प्रलंबित प्रश्न हे यंदाच्या प्रचारातील प्रमुख मुद्दे ठरणार आहेत.त्याचबरोबर तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी सोशल मीडियाचाही मोठ्या प्रमाणात वापर होण्याची शक्यता आहे.
वॉर्डनिहाय मतदार यादी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेदरम्यान तलाठी भारती बारहाते, तलाठी विजय चव्हाण, ग्रामविकास अधिकारी आप्पा भानवसे यांच्यासह इच्छुक उमेदवार, ग्रामस्थ आणि संबंधित अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांनी आपल्या नावातील दुरुस्त्या, पत्ते आणि इतर तपशील अद्ययावत करून घेण्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
दरम्यान, निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच आचारसंहिता लागू होणार असल्याने येत्या काही दिवसांत गावातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. आगामी काळात इच्छुकांच्या बैठका, गाठीभेटी, मतदार संपर्क आणि राजकीय समीकरणांना वेग आल्याने टाकवे बुद्रुक ग्रामपंचायतीची निवडणूक यंदा प्रतिष्ठेची, रंगतदार आणि अत्यंत चुरशीची ठरणार, असे चित्र सध्या स्पष्टपणे दिसून येत आहे.मतदार यादी वर हरकत २४ जुलै ते २९ पर्यंत असुन ४ ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे



