
वडगाव मावळ (प्रतिनिधी) : एकात्मिक बाल विकास सेवा योजना, पंचायत समिती मावळ, प्रथम एज्युकेशन संस्था आणि ग्रामपंचायत इंदोरी यांच्या संयुक्त विद्यमाने इंदोरी येथे ‘नवचेतना पालक-बालक मेळावा’ उत्साहात पार पडला. ० ते ३ वयोगटातील बालकांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे आणि आनंददायी वातावरणात शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश होता.
मेळाव्यात बालकांच्या वयोगटानुसार विविध विकासात्मक घटकांवर आधारित स्टॉल्स उभारण्यात आले होते. या माध्यमातून पालकांना प्रत्यक्ष कृतीद्वारे (ऍक्टिव्हिटी) मुलांच्या बौद्धिक, शारीरिक आणि भावनिक विकासाची माहिती देण्यात आली. तसेच विकास पत्रिकेनुसार बालकांच्या प्रगतीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाला पुणे जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी माननीय खंडागळे साहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी अंगणवाडीतील पोषण आहार, पूर्व-प्राथमिक शिक्षणाचा दर्जा आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच या योजनांची व्यापक प्रसिद्धी करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
पंचायत समिती सदस्य माननीय दिलीप आण्णा ढोरे यांनी अंगणवाडीच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करत अधिकाधिक पालकांनी आपल्या मुलांना अंगणवाडी आणि जिल्हा परिषद शाळेत शिक्षणासाठी पाठवावे, असे आवाहन केले.
यावेळी इंदोरी गावचे सरपंच शशिकांत शिंदे, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य, बालविकास प्रकल्प अधिकारी नेहा ठाकूर, प्रथम संस्थेच्या ऊषा लाटे, विविध संस्थांचे पदाधिकारी, तसेच एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या पर्यवेक्षिका, तळेगाव विभागातील अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर आणि मोठ्या संख्येने पालक व बालक उपस्थित होते.
कार्यक्रमाची प्रस्तावना ऊषा लाटे यांनी केली. सूत्रसंचालन पर्यवेक्षिका जुलेखा शेख यांनी तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षिका स्मिता नाईक यांनी केले.


