
टाकवे बुद्रुक – आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गावातील एकजूट वाढवून योग्य नियोजन करण्यासाठी टाकवे बुद्रुक येथे सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक 23-11-2025 रोजी रात्री ७ वाजता भैरवनाथ मंदिर येथे होणाऱ्या या बैठकीत गावातील ज्येष्ठ कारभारी, सर्वपक्षीय नेते, तरुण कार्यकर्ते, इच्छुक उमेदवार तसेच सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी निवडणुकीत योग्य दिशा ठरवण्याचा हा प्रयत्न असून, विविध स्तरावरील मतभिन्नता बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येण्याची गरज व्यक्त केली जात आहे. मागील काही निवडणुकांमध्ये झालेल्या विविध अनुभवांचा आढावा घेणे, आगामी निवडणुकीचे संभाव्य समीकरण स्पष्ट करणे, योग्य नेतृत्वाची निवड करणे आणि गावाच्या हितासाठी एकमताने पुढील रणनीती ठरवणे हे या बैठकीचे प्रमुख उद्दिष्ट असेल.
गावात राजकीय पातळीवर विविध पक्षांचे अस्तित्व असले तरी विकास हा समान धागा मानून सर्वांनी एका व्यासपीठावर येण्याचा हा उपक्रम सकारात्मक पाऊल ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. विशेषत: तरुण कार्यकर्त्यांचा सहभाग वाढवणे, उमेदवारांची छाननी, गावातील नागरिकांच्या सूचनांना प्राधान्य देणे आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता राखणे याबाबतही या बैठकीत सविस्तर चर्चा होणार आहे.
गावाची एकजूट, विकासाची दिशा आणि निवडणुकीतील सक्षम नेतृत्व या तिन्ही मुद्द्यांवर निर्णायक चर्चा होणार असल्यामुळे रविवारी होणारी बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. गावाच्या हितासाठी सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.



