मावळ

‘स्मार्ट’ प्रकल्पातून महिला सक्षमीकरणाचा ‘वेध’; फळणे येथे कृषी वेध महिला शेतकरी कंपनीच्या राईस मिलचे भूमिपूजन

इंद्रायणी तांदळाला हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी कटिबद्ध राहण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांचे आवाहन

Spread the love

टाकवे बुद्रुक – मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत मावळ तालुक्यातील टाकवे बुद्रुक-वडेश्वर जिल्हा परिषद गटातील फळणे येथे ‘कृषी वेध महिला शेतकरी उत्पादक कंपनी’च्या नियोजित कामाचे भूमिपूजन पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. गजानन पाटील यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि कृषी व्यवसायाला चालना देण्यासाठी आयोजित या कार्यक्रमास जिल्हा अभियान सहसंचालक तथा प्रकल्प संचालक मा. श्रीम. शालिनी कडू, पंचायत समिती मावळचे गटविकास अधिकारी मा. श्री. कुलदीप प्रधान, तसेच सहाय्यक गटविकास अधिकारी मा. श्री. सेवक थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते कृषी वेध महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या बांधकामाचे विधिवत भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे मुख्य कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात महिलांच्या स्वयंसहायता समूहांना व्यवसायासाठी तब्बल २० लाख रुपयांच्या कर्जाचे प्रातिनिधिक स्वरूपात वितरण करण्यात आले, ज्यामुळे ग्रामीण महिलांच्या उद्योगशीलतेला बळ मिळाले आहे.

कार्यक्रमादरम्यान टाकवे बुद्रुक ग्रामपंचायतीचे सरपंच अविनाश असवले, उपसरपंच ज्योती आंबेकर,परशुराम मालपोटे, प्रिया मालपोटे व सदस्यांच्या वतीने मा. मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच, कृषी वेध कंपनीच्या संचालक श्रीमती रंजना प्रकाश तनपुरे आणि सुनीता कैलास मालपोटे यांनीही पाहुण्यांचे स्वागत व सत्कार केला.

उपस्थितांना मार्गदर्शन करताना मा. श्री. गजानन पाटील म्हणाले की, “मावळच्या इंद्रायणी तांदळाला भविष्यात मोठी मागणी आणि हक्काचे मार्केट असणार आहे. जिल्ह्यामध्ये उपलब्ध असलेल्या स्वयंसहायता समूहांच्या मॉलच्या माध्यमातून विक्री व्यवस्था भक्कम करण्यात येईल. कोणतीही कंपनी किंवा उद्योग चालवताना सुरुवातीच्या काळात संयम बाळगणे अत्यंत गरजेचे आहे. संयम आणि सातत्य ठेवल्यास व्यवसाय निश्चितच यशस्वी होतो.”

यावेळी मा. प्रकल्प संचालक श्रीम. शालिनी कडू यांनीही महिलांना आश्वस्त केले. “कंपनीचे काम पुढे नेण्यासाठी प्रशासनाकडून वेळोवेळी आवश्यक ते मार्गदर्शन आणि सर्वोतोपरी मदत केली जाईल,” असे आश्वासन त्यांनी दिले.

 कार्यक्रमास कृषी वेध महिला शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक मंडळ, सल्लागार, जिजाऊ महिला प्रभाग संघाच्या पदाधिकारी, उमेद अभियानाचे कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button