सामाजिक

वन्यजीव रक्षक संस्थेचा पुढाकार; नागरिकांसह विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन

Spread the love

फळणे (ता. मावळ): आंदर मावळातील डोंगरदऱ्यांमध्ये आणि निसर्गरम्य परिसरात सध्या बिबट्याचा वावर वाढला असून, अनेक ठिकाणी बिबट्याचे दर्शन होत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असतानाच, बिबट्यापासून स्वतःचे संरक्षण कसे करावे आणि खबरदारी कशी घ्यावी, याविषयी जनजागृती करण्यासाठी पुणे वनविभाग आणि वन्यजीव रक्षक मावळ संस्था यांनी संयुक्तपणे फळणे येथे विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन केले होते.

सध्या आंदर मावळातील विविध वाड्या-वस्त्यांवर आणि डोंगर परिसरात बिबट्याचे अस्तित्व जाणवत आहे. अशा परिस्थितीत मानवी संघर्ष टाळण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी योग्य माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. या उद्देशाने आयोजित कार्यक्रमात वनरक्षक काळुराम कड आणि वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य आकाश ओव्हाळ यांनी उपस्थित ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.

यावेळी मार्गदर्शन करताना आकाश ओव्हाळ आणि काळुराम कड यांनी बिबट्याची वर्तणूक, त्याच्या सवयी आणि वावर असलेल्या क्षेत्रात वावरताना घ्यायची काळजी यावर प्रकाश टाकला. विशेषतः पहाटे आणि रात्रीच्या वेळी बाहेर पडताना काय खबरदारी घ्यावी, लहान मुलांची काळजी कशी घ्यावी, आणि अचानक बिबट्या समोर आल्यास आरडाओरडा न करता शांत राहून बचाव कसा करावा, याचे प्रात्यक्षिक व तांत्रिक माहिती उपस्थितांना दिली.

या महत्त्वपूर्ण उपक्रमासाठी फळणे आणि परिसरातील नागरिक, महिला, तसेच शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वनविभाग आणि वन्यजीव रक्षक संस्थेच्या या तत्परतेमुळे नागरिकांमधील भीती कमी होऊन सतर्कता वाढण्यास मदत झाली आहे, अशी भावना स्थानिकांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button