मावळ

मावळच्या विकासाचा ‘हायव्होल्टेज’ आढावा; कामचुकार ठेकेदारांवर कारवाईचा बडगा!

आमदार सुनील शेळके यांचे निर्देश: 'जलजीवन', शिक्षण आणि घरकुल योजनेत पारदर्शकता हवीच

Spread the love

    वडगाव मावळ: मावळ तालुक्यातील विकासकामांमध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. विशेषतः ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत रखडलेली कामे तातडीने मार्गी लावा आणि तक्रारी असलेल्या ठेकेदारांना थेट काळ्या यादीत टाका,” असे सक्त निर्देश मावळचे आमदार सुनील शेळके यांनी दिले. बुधवारी (दि. १७) पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित विकासकामांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

आमदार सुनील शेळके यांनी पंचायत समिती अंतर्गत सुरू असलेल्या विविध विभागांच्या कामांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी प्रशासकीय कामात गती आणण्यासाठी आणि योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांना ‘ॲक्शन मोड’मध्ये काम करण्याच्या सूचना दिल्या.

• पाणी आणि घरांच्या प्रश्नावर विशेष भर

जलजीवन मिशन’ची कामे अपूर्ण राहिल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत असल्याची गंभीर दखल घेत, आमदार शेळके यांनी संबंधित ठेकेदारांवर कारवाईचे आदेश दिले. तसेच, मंजूर घरकुलांची कामे तातडीने सुरू करण्यासाठी ठेकेदारांची नेमणूक करणे आणि वन विभाग व भूमिअभिलेख विभागाकडून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घेण्याबाबत सूचना दिल्या.

• विद्यार्थ्यांच्या हिताशी तडजोड नाही

शिक्षण विभागाचा आढावा घेताना त्यांनी स्पष्ट केले की, पोषण आहार, गणवेश आणि बूट यांसारख्या बाबींमध्ये निकृष्ट दर्जा खपवून घेतला जाणार नाही. अशा ठेकेदारांवर कठोर कारवाई होईल. शिक्षकांनी केवळ अध्यापनावर थांबून न राहता शाळांची पटसंख्या वाढवणे, स्वच्छतागृहांची उभारणी आणि शाळेचा सर्वांगीण विकास करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच, आगामी काळात शालेय क्रीडा स्पर्धा भव्य स्वरूपात आयोजित करण्याचे व CSR निधीतून शाळांचा कायापालट करण्याचे निर्देश दिले.

• पायाभूत सुविधा आणि ग्रामसेवक स्पर्धा

तालुक्यातील पाणंद रस्त्यांची कामे आणि जिल्हा वार्षिक योजनेतील कामे आचारसंहितेपूर्वी सुरू करण्यासाठी वर्क ऑर्डर देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. विशेष म्हणजे, गावांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि प्रशासकीय कामात निरोगी स्पर्धा निर्माण व्हावी, यासाठी तालुका स्तरावर ‘ग्रामसेवक स्पर्धा’ आयोजित करण्याची नाविन्यपूर्ण संकल्पना त्यांनी मांडली.

यावेळी रोजगार हमी योजना, महिला व बालकल्याण विभागाच्या योजना आणि कृषी योजनांचाही आढावा घेण्यात आला. पंचायत समितीची इमारत डिजिटल आणि सुसज्ज करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यास सांगण्यात आले.

सदर बैठकीला गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान, सहाय्यक गटविकास अधिकारी सेवक थोरात, तसेच सार्वजनिक बांधकाम, वनविभाग, भूमिअभिलेख, विद्युत, पाटबंधारे विभागाचे अधिकारी आणि ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button