थंडीवर मात! शिंदेवाडी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना दानशूर व्यक्तींंकडून स्वेटर वाटप

वडेश्वर – ठोकळवाडी धरण परिसरातील कडाक्याच्या थंडीमध्ये शिंदेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना उबदार आधार मिळाला आहे. डिसेंबर महिन्यात वाढलेल्या थंडीमुळे विद्यार्थ्यांचे संरक्षण व्हावे, त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये, यासाठी पुणे केशवनगर येथील दानशूर नागरिक — नारायण सुराले, रेणुका गायकवाड आणि अनुराधा हरिहर — यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत स्वेटरचे वाटप केले.
शासनाकडून पाठ्यपुस्तके व गणवेश मिळत असले तरी थंडीपासून संरक्षण देणारी वस्त्रांची गरज ओळखून या तिघांनी पुढाकार घेतला. उत्तम दर्जाचे स्वेटर मिळाल्याने विद्यार्थ्यांचे आजारी पडण्याचे प्रमाण कमी होईल आणि त्यांच्या शिक्षणात अडथळा येणार नाही, असे शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता भोसले यांनी सांगितले.
दरवर्षी विविध संस्थांकडून शैक्षणिक साहित्य मिळत असले तरी यंदाचा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी विशेष ठरला आहे. स्वेटर वाटप कार्यक्रमात शिक्षक उमेश माळी व राजू वाडेकर यांनी विशेष सहकार्य केले.
थंडीत विद्यार्थ्यांना उबदार साथ देत सामाजिक बांधिलकीचा सुंदर आदर्श या दानशूर व्यक्तींनी घालून दिला आहे.



