मावळ

टाकवे बुद्रुक येथील स्टोन क्रशर करारप्रकरणी ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा; १५ दिवसांत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

Spread the love

मावळ – मावळ तालुक्यातील टकवे बुद्रुक येथील स्टोन क्रशर करार आणि खनिज उत्खनन प्रकरणी ग्रामस्थांनी प्रशासनाला धारेवर धरले असून, संबंधित करार त्वरित रद्द करून जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात समस्त ग्रामस्थ टकवे बुद्रुक यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे लेखी निवेदन देण्यात आले आहे.

ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनानुसार, टकवे बुद्रुक व बेलज परिसरातील गट क्रमांक १०७, ११, २००, २०१, २११, २२२, २३३ व २३० या क्षेत्रातील स्टोन क्रशर करारासाठी खनिज उत्खननासंदर्भात दिलेल्या NOC चा गैरवापर करून मोठ्या प्रमाणात उत्खनन आणि वाहतूक सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संदर्भात यापूर्वी ग्रामसभेमध्ये विशेष ठराव घेऊन संबंधित व्यवहारास विरोध नोंदविण्यात आला होता.

त्यानंतर मा. तहसीलदार मावळ यांनी दिनांक ०२ डिसेंबर २०२४ रोजी संबंधित करार मालकांना नोटीस बजावून आदेश दिले होते. मात्र, आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले आहे. उलटपक्षी, संबंधित करार व वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरूच असून, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा देत, येत्या १५ दिवसांत संबंधित करारावर तातडीने कारवाई करून उत्खनन थांबवावे, अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. आंदोलनातून उद्भवणाऱ्या परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही ग्रामस्थांनी स्पष्ट केले आहे.

या निवेदनाची प्रत आमदार सुनील शेळके तहसीलदार मावळ, वडगाव मावळ पोलीस स्टेशन, तसेच पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक आणि संबंधित प्रशासनाला पाठविण्यात आली आहे. या प्रकरणामुळे टकवे बुद्रुक परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, प्रशासन या गंभीर बाबीकडे कितपत गांभीर्याने लक्ष देते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button