सामाजिक

निगडी ते भोयरे बससेवा तात्काळ सुरू करा; खासदार श्रीरंग बारणे यांची पीएमपीएमएल प्रशासनाकडे मागणी

Spread the love

भोयरे – मावळ लोकसभा मतदारसंघातील भोयरे आणि परिसरातील नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन, ‘निगडी ते भोयरे’ ही बससेवा सुरू करण्याची मागणी मावळचे खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांनी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडे (PMPML) पत्राद्वारे केली आहे.

भोयरे हा भाग मावळ लोकसभा मतदारसंघात येतो. या भागातून मोठ्या संख्येने नागरिक नोकरी-व्यवसायानिमित्त दररोज प्रवास करतात. यामध्ये आयटी (IT) क्षेत्रात काम करणारे कर्मचारी, मजूर वर्ग, दूध व्यावसायिक तसेच घरकाम करणाऱ्या महिलांचा मोठा समावेश आहे. यासोबतच शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी देखील शिक्षणासाठी येथून निगडी आणि पिंपरी-चिंचवड परिसरात ये-जा करतात.

सद्यस्थितीत या मार्गावर ‘निगडी ते टाकवे बुद्रुक’ (बस क्रमांक ३७१) ही बससेवा सुरू आहे. मात्र, ही बस केवळ टाकवे बुद्रुकपर्यंतच येत असल्याने पुढे भोयरे गावापर्यंत जाण्यासाठी प्रवाशांना कोणतेही साधन उपलब्ध नाही. टाकवे बुद्रुक ते भोयरे दरम्यान बससेवा नसल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. वेळेवर वाहन न मिळाल्याने अनेकदा कामगारांना कामावर पोहोचण्यास उशीर होतो, तर विद्यार्थ्यांना आणि महिलांना घरी परतण्यास विलंब होतो.

या सर्व समस्यांची गांभीर्याने दखल घेत, खासदार बारणे यांनी पीएमपीएमएलच्या महाव्यवस्थापकांना पत्र लिहून सदर मार्गाचा विस्तार करण्याची विनंती केली आहे. सध्या निगडी ते टाकवे बुद्रुक धावणारी बस क्रमांक ३७१ ही पुढे ‘भोयरे’ (Last Stop) पर्यंत वाढवावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे.

ही बससेवा सुरू झाल्यास या भागातील शेतकरी, विद्यार्थी, नोकरदार आणि महिला वर्गाला मोठा दिलासा मिळणार असून, त्यांचा वेळ व श्रम वाचण्यास मदत होणार आहे. त्यामुळे पीएमपीएमएल प्रशासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करून त्वरित अंमलबजावणी करावी, असे आवाहन खासदार बारणे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button