मावळच्या राजकारणात मोठे स्थित्यंतर; मेघाताई भागवत यांचा केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश, इंदोरी गटातून उमेदवारी जाहीर!

इंदोरी – मावळ तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजल्यापासून राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर इंदोरी भागात आपल्या जनसंपर्काने आणि विकासकामांच्या माध्यमातून जनतेचा विश्वास संपादन केलेल्या लोकप्रिय नेत्या मेघाताई भागवत यांनी आज भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
पक्षप्रवेशासोबतच भारतीय जनता पक्षाने मेघाताई भागवत यांना इंदोरी जिल्हा परिषद गटातून अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे इंदोरी गटातील निवडणुकीची चुरस वाढली असून, भाजपची ताकद मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे मानले जात आहे.
मेघाताई भागवत पक्षात प्रवेश केल्यानंतर आपली प्रतिक्रिया देताना मेघाताई भागवत म्हणाल्या की, “विकासाच्या या प्रवासात सहभागी होताना मला अत्यंत आनंद होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सबका साथ, सबका विकास’ या मंत्रावर माझा ठाम विश्वास असून, त्याच प्रेरणेने मी आजपासून नव्या जोमाने कार्याला सुरुवात करत आहे.”
या भव्य पक्षप्रवेश सोहळ्याला माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, विधानसभा प्रचार प्रमुख रवींद्र आप्पा भेगडे, माजी संचालक बाळासाहेब नेवाळे,माजी सभापती निवृत्ती भाऊ शेटे, माजी तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे, माजी सभापती गुलाबराव म्हाळस्कर, यांच्यासह अनेक मान्यवर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसे मावळमधील राजकीय वातावरण अधिकच तापू लागले असून, मेघाताईंच्या रूपाने भाजपने इंदोरी गटात एक तगडा उमेदवार रिंगणात उतरवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.



