युवा उद्योजक निवृत्ती ठाकर यांच्या माध्यमातून महिलांना विमानातून अयोध्या प्रवास
प्रथमच मावळ तालुक्यात झालेल्या या उपक्रमाचे होतय कौतुक

टाकवे बुद्रुक – मावळ तालुक्यातील महिलांसाठी ऐतिहासिक आणि अविस्मरणीय ठरणारा असा एक उपक्रम युवा उद्योजक निवृत्ती ठाकर यांच्या पुढाकारातून नुकताच राबविण्यात आला आहे आंदर मावळ परिसरातील नागाथली याठिकाणी युवा उद्योजक निवृत्ती ठाकर मित्र परिवाराच्या वतीने आयोजित केलेल्या होम मिनिस्टर या अनोख्या सांस्कृतिक कार्यक्रमात महिलांसाठी विविध पारंपरिक खेळ, कला सादरीकरण तसेच ज्ञानवर्धक स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या कार्यक्रमातील लकी ड्रॉच्या चिठ्ठ्या काढताना निवड झालेल्या एकूण १२ भाग्यवान महिलांना मोफत विमान प्रवासाद्वारे अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराचे पवित्र दर्शन घडविण्याचा अनोखा निर्णय युवक नेते निवृत्ती ठाकर यांनी घेतला होता यांची वचनपूर्ती त्यांनी केली आहे
आजच्या काळात महिलांना घरगुती जबाबदाऱ्यांमुळे स्वतःसाठी वेळ काढणे कठीण होत असते, हे वास्तव ओळखून ‘महिलांनाही आनंद, पर्यटन आणि आध्यात्मिक अनुभव मिळावा’ या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे ठाकर यांनी सांगितले. “घर सांभाळणाऱ्या आणि समाज उभा करणाऱ्या प्रत्येक महिलेला प्रोत्साहन, आदर आणि आनंद मिळाला पाहिजे. त्यांना विमान प्रवासाचा आणि अयोध्या दर्शनाचा आनंद मिळाल्याने आम्हा सर्वांना समाधान वाटते,” असे त्यांनी कार्यक्रमात नमूद केले.
या निवडलेल्या १२ महिलांना प्रथम पुणे विमानतळावरून विमान प्रवासाचा रोमांचकारी अनुभव दिला गेला. आयुष्यभरात कधी विमान प्रवासाची कल्पना न केलेल्या अनेक महिलांच्या चेहऱ्यावर आनंद, कौतुक आणि भावनिक अश्रू ओसंडून वहात होते. अयोध्येला पोहोचल्यानंतर श्रीरामलला मंदिरातील दर्शन, रामकथा परिसर, सरयू घाट दर्शन यांचा मनोभावे आनंद घेतला.
कार्यक्रमातील प्रवासाचे नियोजन व निवास व्यवस्था आणि प्रत्येक महिला सुरक्षित आणि आनंदी राहील याची काळजी निवृत्ती भाऊ ठाकर यांच्या वतीने घेण्यात आली होती
या नवीन उपक्रमामुळे मावळ तालुक्यात आनंदाचे वातावरण असून, समाजातील सर्व स्तरातून निवृत्ती ठाकर यांच्या कल्पकतेचे आणि सामाजिक बांधिलकीचे कौतुक होत आहे. विशेषतः महिलांमध्ये आत्मविश्वास वाढविणे, समाजात त्यांचे योगदान मान्य करून त्यांना सन्मान देणे या दृष्टीने हा उपक्रम प्रेरणादायी मानला जात आहे.या उपक्रमामुळे ‘महिला सन्मान आणि समाजातील त्यांची अग्रस्थानी भूमिका’ नव्या दृष्टिकोनातून अधोरेखित झाली आहे. या १२ महिलांसाठी हा अनुभव आयुष्यभर लक्षात राहणारा ठरला आहे.
“आमच्या आयुष्यात कधी विमानाने प्रवास करणे आणि श्रीराम मंदिराचे प्रत्यक्ष दर्शन होईल, असे वाटलेही नव्हते निवृत्ती भाऊ ठाकर दाखवलेला हा विश्वास आणि दिलेली ही अनुभूती आम्ही आयुष्यभर विसरू शकणार नाही.”
– सीमा शाहीदास वाडेकर ,सहभागी भाग्यवान महिला
“घर, कुटुंब आणि समाज सांभाळताना महिला स्वतःसाठी वेळ देऊ शकत नाहीत. त्यांना आनंद, सन्मान आणि अनुभव मिळावा या हेतूने हा उपक्रम राबवला. या १२ भगिनींच्या आनंदी चेहऱ्यांनी आम्हाला खूप समाधान दिले. पुढेही महिलांसाठी असे उपक्रम सातत्याने राबवण्याचा आमचा संकल्प आहे.”
– निवृत्ती ठाकर -युवा उद्योजक मावळ



