फळणे येथे संतसेवक श्री.काळुराम मालपोटे यांच्या अमृत महोत्सवाचे आयोजन; भक्तिरसाने न्हाऊन निघणार वातावरण
शनिवारी हभप.माऊली महाराज कदम (छोटे माऊली) यांचे किर्तन

टाकवे बुद्रुक – फळणे गावात येत्या शनिवारी भक्तिमय वातावरण रंगणार आहे. संतसेवक श्री काळुराम दत्तोबा मालपोटे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवानिमित्त विशेष धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून पंचक्रोशीतील वारकरी, सांप्रदायिक भक्त आणि नागरिकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
दिनांक २२ नोव्हेंबर २०२५, शनिवार रोजी हा कार्यक्रम पार पडणार आहे. सायंकाळी ४ ते ५ या वेळेत सामुदायिक भजनाने कार्यक्रमाची सुरुवात केली जाणार आहे. सामुदायिक भजनासाठी गावातील महिलामंडळ, वारकरी दिंडी, तसेच स्थानिक भक्त सहभागी होणार असून हरिनामाच्या गजराने संपूर्ण परिसर भक्तिरसाने ओथंबून जाणार आहे.
यानंतर सायंकाळी ५:३० ते ७:३० या वेळेत हभप गुरुवर्य माऊली महाराज कदम (छोटे माऊली) यांचे कीर्तन रुपी सेवा आयोजित करण्यात आली आहे. छोटे माऊलींच्या प्रभावी व प्रेरणादायी कीर्तनामुळे उपस्थित भक्तांना अध्यात्मिक चिंतनाचा आणि भावनिक समाधानाचा अनुभव मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. कीर्तनात ज्ञानेश्वरी, भागवत आणि वारकरी परंपरेतील मूल्यांचा सुंदर संगम सादर होणार आहे.
संतसेवक काळुराम मालपोटे यांनी गेल्या अनेक दशकांपासून सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात केलेल्या सेवाभावपूर्ण कार्याचा गौरव म्हणून हा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली वारकरी परंपरा जोपासण्यासाठी अनेक उपक्रम राबवले गेले असून स्थानिकांमध्ये त्यांच्याविषयी आदराची भावना आहे.
मालपोटे परिवाराच्या वतीने पंचक्रोशीतील सर्व सांप्रदायिक भक्त, वारकरी मंडळी, महिलावर्ग आणि सर्व नागरिकांना या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हा अमृत महोत्सव सोहळा भक्तिरस, हरिनाम आणि कीर्तन परंपरेचा उत्सव ठरणार असून फळणे गावात आध्यात्मिक वातावरण बहरणार आहे.



