मावळातील सखुबाई लंकेचा स्वर सोशल मीडियावर घुमतोय
संसाराच्या जंजाळातून उगवलेला ‘सुरेल आवाज’ लाखोंच्या हृदयाला भिडला

टाकवे बुद्रुक (ता. मावळ) — आयुष्यभर संसाराच्या चक्रात अडकलेल्या एका साध्या गृहिणीचा सूर अचानक लाखोंच्या मोबाईलमध्ये झंकारू लागेल, हे कुणालाही वाटले नव्हते. पण घोणशेत येथील सखुबाई लंके यांच्या हृदयातून उसळलेल्या सुरेल गाण्याने हे अशक्य भासणारे स्वप्न वास्तवात उतरवले आहे. त्यांच्या एका छोट्याशा व्हिडिओने इन्स्टाग्रामवर मने जिंकायला सुरुवात केल्यापासून, सखुबाईंचा स्वर सोशल मीडियावर अक्षरशः वाऱ्यासारखा पसरू लागला आहे.
बालपणीच्या लहानशा रेडिओवर ऐकलेल्या गाण्यांच्या आठवणी, गोंधळलेल्या स्वयंपाकघरात गुणगुणलेले सूर, आणि जबाबदाऱ्यांमध्ये हरवत गेलेली त्यांची कला—हे सगळं एखाद्या क्षणी पुन्हा फुलून यावं, यासाठी जणू नियतीने स्वतः पुढाकार घेतला. काही दिवसांपूर्वी त्यांच्या मुलाने अपलोड केलेला व्हिडिओ क्षणात व्हायरल झाला. ‘पत्ता पत्ता निकम्मा’ सारख्या जुन्या हिंदी गाण्याला त्यांनी दिलेला भावनिक स्पर्श लाखो लोकांच्या हृदयाला भिडला.
त्यांच्या आवाजात कृत्रिम गोडवा नाही, पण आहे खऱ्या भावनांचा ओलावा… साध्या जीवनातील अनुभवांचे सत्य… आणि मनाच्या तळातून येणारी एक निर्मळ लय. म्हणूनच कदाचित हा आवाज ऐकणाऱ्याला एका क्षणासाठी स्वतःच्या मनात डोकावायला लावतो; काहींना भूतकाळाच्या आठवणींची एक झेप देतो, तर काहींना घरच्या आईसारखी माया जाणवते.
मावळ परिसरातील अनेकांनी त्यांच्या गायकीने प्रेरणा घेतली असून, सामान्य माणसाचाही आवाज जगभर पोहोचू शकतो, हे सखुबाईंच्या कथा पुन्हा एकदा सिद्ध करते. सोशल मीडियाच्या महासागरात त्यांच्या आवाजाचा छोटासा पण सुरेल लहरींचा प्रवास आता लाखोंच्या मनात कायमचा घर करून बसला आहे.
“हेवढी वर्षं माझं गाणं घरापुरतं राहिलं. संसार, मुलं, जबाबदाऱ्या… सगळ्यात माझं गाणं हरवून गेलं, असं वाटायचं. पण आता लोक माझा आवाज आवडीने ऐकतात हे पाहून मन भरून येतं. लोकांनी दिलेलं प्रेम हे माझ्यासाठी सर्वात मोठं यश आहे. पुढे एखाद्या मोठ्या मंचावर गाण्याची संधी मिळाली तर मी ते माझ्या गावासाठी सोनं करून आणीन.”
– सखुबाई लंके,गायिका



