७५ वर्षांचा अंधार फिटणार! ऐतिहासिक राजमाची प्रकाशमय होणार
४.६४ कोटींच्या वीज प्रकल्पाला मंजुरी; आमदार सुनील शेळके यांच्या लेकीचा शब्द ठरला खरा

लोणावळा – सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या आणि इतिहासाची साक्ष देणाऱ्या राजमाची गडाच्या पायथ्याशी आता स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच विजेचा प्रकाश पडणार आहे. मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या अथक प्रयत्नांतून राजमाची, उधेवाडी आणि परिसरातील दुर्गम आदिवासी वाड्यांसाठी ४ कोटी ६४ लाख रुपयांचा भव्य वीज प्रकल्प मंजूर झाला आहे.
या निर्णयामुळे गेली अनेक दशके अंधारात काढणाऱ्या आदिवासी बांधवांच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने ‘सुवर्णक्षण’ अवतरला आहे.
ऐतिहासिक निर्णय आणि पाठपुराव्याचे यश लोणावळ्याजवळील राजमाची गाव, वनहाटी वस्ती, उधेवाडी आणि फणसराई ही गावे निसर्गरम्य असली तरी, स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही येथे वीज पोहोचली नव्हती. भौगोलिक दुर्गमता आणि वनविभागाच्या हद्दीमुळे येथे वीज पोहोचवणे हे एक मोठे आव्हान होते. एकाच कामासाठी मोठ्या निधीची आवश्यकता असल्याने तांत्रिक अडचणी येत होत्या. मात्र, आमदार सुनील शेळके यांनी हा प्रश्न प्रतिष्ठेचा करत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अजितदादा पवार यांच्याकडे विशेष निधीची मागणी केली. दादांनीही या मागणीची तत्काळ दखल घेत जिल्हा नियोजन समितीच्या (आदिवासी विकास विभाग) माध्यमातून तब्बल ४ कोटी ६४ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला.
लेकीने दिलेला शब्द पूर्ण! या विकासकामामागे एक भावनिक किनारही आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आमदार सुनील शेळके यांची कन्या श्रद्धा शेळके यांनी या दुर्गम भागाचा दौरा केला होता. येथील अंधकारमय वास्तव पाहून त्यांनी ग्रामस्थांना एक वचन दिले होते –
“जोपर्यंत तुमच्या भागात वीज आणणार नाही, तोपर्यंत इथे परत येणार नाही.”आज आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून हा प्रकल्प मंजूर झाल्याने लेकीने दिलेला शब्द पूर्ण झाला आहे. यामुळे स्थानिक ग्रामस्थांचा लोकप्रतिनिधींवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.
वीज पोहोचल्यामुळे या भागात आमूलाग्र बदल होणार आहेत:
* पर्यटन वाढ: राजमाची हे पर्यटकांचे आवडते ठिकाण असल्याने वीज आल्यावर येथे पर्यटनाला मोठी चालना मिळेल.
* शिक्षण व आरोग्य: शालेय विद्यार्थ्यांचा अभ्यास आणि आरोग्य केंद्रातील सोयीसुविधांमध्ये सुधारणा होईल.
* लघुउद्योग: स्थानिकांना कृषीपूरक आणि पर्यटनपूरक व्यवसाय सुरू करता येतील.
या ऐतिहासिक कामासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, महावितरण आणि आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले असून, लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
“गेल्या अनेक वर्षांपासून अंधारात राहणाऱ्या माझ्या मायबाप जनतेला प्रकाश देण्याचे भाग्य मला लाभले, याचे मोठे समाधान आहे. अजितदादांच्या सहकार्यामुळे आणि प्रशासनाच्या मदतीने आम्ही हे शिवधनुष्य पेलू शकलो. हा केवळ वीज प्रकल्प नसून या भागाच्या सर्वांगीण विकासाची ही नांदी आहे.”
– आमदार सुनील शेळके



