टाकवे ग्रामपंचायतीत ५% अपंग निधीचे पारदर्शक वाटप — सामाजिक बांधिलकीचा आदर्श दाखवणारा उपक्रम
टाकवे ग्रामपंचायत हद्दीतील ५२ अपंग लाभार्थ्यांना धनादेश वाटप

टाकवे बुद्रुक – समाजातील सर्व घटकांना विकासाच्या प्रवाहात सहभागी करून घेण्याच्या उद्देशाने टाकवे ग्रामपंचायतीतर्फे अपंग व्यक्तींकरिता राखीव ५% निधीचे पारदर्शक वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे गावातील दिव्यांग नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रसंगी ग्रामपंचायतीचे सरपंच अविनाश असवले, माजी उपसरपंच परशुराम मालपोटे, सदस्या प्रतिक्षा जाधव, वरीष्ठ लिपीक गणेश वाळुंजकर आणि कनिष्ठ लिपीक सुशिल वाडेकर उपस्थित होते. ग्रामपंचायतीच्या कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमात एकुण ५२ पात्र लाभार्थ्यांना आर्थिक मदतीचे धनादेश वाटप करण्यात आले
सरपंच अविनाश असवले यांनी सांगितले की, “ग्रामपंचायतीचा निधी हा सर्वांचा आहे. दिव्यांग नागरिकांनाही समान संधी मिळावी, यासाठी हा उपक्रम राबवला. आगामी काळातही अशा सामाजिक योजनांना प्राधान्य दिले जाईल.”
या वाटपामुळे गावातील लाभार्थ्यांनी ग्रामपंचायतीचे आभार मानले असून ग्रामपंचायत प्रशासनाच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. टाकवे ग्रामपंचायतीने दाखवलेली संवेदनशीलता आणि सामाजिक उत्तरदायित्व हा इतर ग्रामपंचायतींसाठी आदर्श ठरावा, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.



