मावळ

अष्टपैलू कर्तृत्वाला सलाम! पूर्वा गायकवाड यांचा महिला दिनानिमित्त लोणावळा नगरपरिषदेकडून विशेष सन्मान

Spread the love

लोणावळा – विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत धुरंधर कामगिरी करणाऱ्या लोणावळ्यातील पूर्वा रत्नप्रभा मधुकर गायकवाड यांचा जागतिक महिला दिनानिमित्त लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. त्यांच्या सर्वांगीण कार्याची दखल घेत हा गौरव सोहळा उत्साहात पार पडला.

राजकारण, समाजकारण, क्रीडा, नृत्य, अभिनय, व्यवसाय आणि सौंदर्य क्षेत्र अशा अनेक अंगांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या पूर्वा गायकवाड या आजच्या पिढीतील प्रेरणादायी अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणून उदयास आल्या आहेत.

स्काउट गाईड क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत त्यांनी राज्यस्तरीय पुरस्कार पटकावला असून हा सन्मान राज्यपालांच्या हस्ते राज्यभवनात प्रदान करण्यात आला. तसेच स्काउट गाईड लोणावळा गिल्डच्या महाराष्ट्र स्टेट ब्रँड अॅम्बेसेडर म्हणूनही त्यांनी यशस्वी कामगिरी बजावली आहे. कोलकाता, तामिळनाडू, राजस्थान, आंध्र प्रदेश अशा विविध राज्यांत सहभाग नोंदवत ‘बेस्ट यूथ अवॉर्ड’ मिळवून त्यांनी आपली वेगळी छाप निर्माण केली आहे.

साहसी क्रीडा प्रकारांमध्येही त्यांची विशेष प्रावीण्य असून दांडपट्टा, लाठी-काठी, तलवारबाजी, भालाफेक यांसारख्या प्रकारांमध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. राजकीय क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोणावळा शहर युवती अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी समर्थपणे सांभाळली आहे.

सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांची कामगिरी तितकीच लक्षणीय आहे. गरबा, लावणी आणि कथ्थक या नृत्यप्रकारांत त्या पारंगत असून अनेक स्पर्धांमध्ये परीक्षक म्हणून त्यांनी काम केले आहे. ‘श्री शिवशंभू शौर्यगाथा’ आणि ‘महाराष्ट्राची महागाथा’ या सादरीकरणांमध्ये अभिनयासोबतच कोरिओग्राफीची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पेलली आहे. ‘अंगात मराठी संस्कृती’ या संकल्पनेतून स्टार ढोलवादक म्हणूनही त्यांनी विशेष ओळख निर्माण केली आहे.

सध्या त्या प्रोफेशनल मेकअप, हेअर आणि नेल आर्टिस्ट तसेच प्रशिक्षक म्हणून कार्यरत असून ‘लाइफस्टाइल सौंदर्य साधना’ या क्षेत्रातही त्यांनी स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे.या सन्मान सोहळ्यावेळी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, कुलस्वामिनी महिला मंचाच्या संस्थापिका सारीकाताई शेळके, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती स्वप्ना अतुल कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

 

यावेळी भावना व्यक्त करताना पूर्वा गायकवाड म्हणाल्या,

“मला मिळालेला हा सन्मान केवळ माझा नसून माझ्या कुटुंबीयांचा, गुरूजनांचा आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाचा आहे. विविध क्षेत्रात काम करताना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले, मात्र जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर मी आज इथपर्यंत पोहोचले आहे. पुढील काळातही समाजासाठी अधिक कार्य करत तरुणांना प्रेरणा देण्याचा माझा प्रयत्न राहील. लोणावळा आणि माझ्या मातीचे ऋण फेडण्यासाठी मी सदैव सकारात्मक काम करत राहीन.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button