पिंपरी चिंचवडपुणेमावळराजकीय

टाकवे पंचायत समिती गणात राष्ट्रवादी, शिवसेना इच्छुकांची प्रचारात आघाडी

भाजपकडून उमेदवार निवडीची प्रक्रिया अद्याप सुरूच

Spread the love

टाकवे बुद्रुक – टाकवे परिसरातील पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी जशी तापू लागली आहे, तसेच विविध राजकीय पक्षांनी आपल्या इच्छुकांची मैदानात उतरण्यास सुरुवात केली आहे. यंदाच्या निवडणुकीत टाकवे पंचायत समिती गणात ओपन महिला आरक्षण असल्यामुळे महिला नेतृत्वाला व्यासपीठ मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी आपापल्या इच्छुक महिलांना प्रचारात पुढे केले असून गावागावांत जोरदार प्रचार मोहीम सुरू आहे. दुसरीकडे भाजपकडून अद्याप उमेदवार निश्चित झालेला नसून अंतर्गत चर्चासत्रे, मतमतांतरे व चाचपणीची प्रक्रिया सुरू असल्याचे दिसून येत आहे.

• राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सुजाता जाधव यांची दमदार प्रचार

– राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून कशाळ येथील सुजाता सोमनाथ जाधव या इच्छुक म्हणून नावाला व्यापक पाठिंबा मिळू लागला आहे. निवडणुकांचे वातावरण तापण्यापूर्वीच त्यांनी गावोगावी जाऊन घराघरात संपर्क मोहीम सुरू केली आहे.सुजाता जाधव यांनी विशेषतः दप्तर वाटप, महिलांशी संवाद बैठक, स्वयंसहाय्यता बचत गटांच्या बैठका, अशा पद्धतीने प्रचार राबविला आहे. दैनंदिन प्रश्न, महिला सक्षमीकरण व स्थानिक विकासाच्या मुद्द्यांवर त्या मतदारांशी चर्चा करत आहेत.आंदर मावळातील अनेक गावांत त्यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत होत आहे. अनेक ठिकाणी तर महिलांनी आरती करून त्यांचे मनस्वी स्वागत करत समर्थन दर्शवले आहे.

 

जाधव यांच्या प्रचाराचा ठळक मुद्दा म्हणजे —

विकासकामांचे ठोस नियोजन,स्थानिक समस्यांचे प्रत्यक्ष निराकरण,स्वच्छ प्रशासन,महिलांसाठी रोजगार व प्रशिक्षण उपक्रम यामुळे ग्रामस्तरावर त्यांची प्रतिमा शांत, संयमी व लोकाभिमुख नेतृत्व अशी निर्माण होत असल्याचे निरीक्षक सांगत आहेत.

————–०००———–०००——–०००————

शिवसेना शिंदे गटाच्या अश्विनी कोंडे यांचा महायुतीच्या माध्यमातून गावोगावी प्रचार दुसरीकडे शिवसेना (शिंदे गटा) कडून टाकवे येथील अश्विनी सोमनाथ कोंडे यांनी मतदारसंघातील प्रचाराला वेग दिला आहे.दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी गावोगावी जाऊन मिठाई वाटप मंदिरे, मंडळे व सामाजिक संस्थांना देणगी ग्रामस्थांशी थेट संवादाच्या माध्यमातून मतदारांशी सतत संपर्क साधत जनसंपर्क वाढवला आहे.

अश्विनी कोंडे यांना शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी मिळाल्यास टाकवे बेलज तसेच आजुबाजुच्या गावातील मोठा मतदार यासह गावातील कार्यकर्त्यांचे जाळे व सामाजिक संस्थांशी सलोखा याचा मोठा फायदा मिळु शकतो असल्याचे बोलले जाते.

 

त्यांच्या प्रचाराचा मुख्य आधार आहे —

महिला सुरक्षेचे प्रश्न,गावातील पाणीपुरवठा व रस्त्यांचे काम,वयोवृद्ध नागरिकांसाठी मदत उपक्रम,गावात स्वच्छता व आरोग्य सुधारणा योजना,अनेक गावांत त्यांनी छोटी सभासमिती ठेवून नागरिकांचे प्रश्न प्रत्यक्ष जाणून घेतले. गावातील ज्येष्ठांकडून आशीर्वाद, तरुणांकडून सहकार्य आणि बचत गटांच्या महिलांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.

 

• भाजपकडून अद्याप उमेदवार निश्चित नाही

या दोन्ही पक्षांनी प्रचारयात्रा सुरू केल्यामुळे गावात राजकीय वातावरण रंगू लागले असले तरी भाजपकडून उमेदवार जाहीर करण्यात विलंब होत आहे. काही स्थानिक इच्छुकांची नावे चर्चेत असली तरी पक्ष पातळीवर भौगोलिक मतसंघटना, कार्यकर्त्यांची निष्ठा, जिंकण्याची क्षमता या सर्व बाबींचा विचार करून सर्वात योग्य उमेदवार निवडण्याचे काम सुरू आहे.भाजपला सध्या मतदारसंघातील अंतर्गत राजकीय समिकरण मांडावे लागत असल्यामुळे निर्णय लांबत असल्याचे सांगितले जाते. मात्र एकदा उमेदवार निश्चित झाला की भाजपचा प्रचारही जोरात होईल असा पक्षनेत्यांचा विश्वास आहे.

• निवडणूक लढत रंगणार चुरशीची

पंचायत समिती निवडणूक ही थेट ग्रामविकासाशी निगडीत असल्याने मतदार अधिक सजग आहेत. त्यामुळे नेत्यांची प्रतिमा, कामाचा अनुभव, गावातली उपस्थिती आणि समाजातील व्यवहार या सर्व गोष्टी निर्णायक ठरणार आहेत.राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी प्रचाराला गती दिल्यामुळे टाकवे गणाची निवडणूक थेट आणि चुरशीची होण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत. आता भाजपची चाल कशी असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.आगामी काही दिवसांत राजकीय समीकरणे आणखी स्पष्ट होतील आणि कोणाकडे मतदारांच्या विश्वासाचा मुकुट रहाणार याची उत्सुकता शिगेला पोहोचणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button