सक्रीय कार्यकर्ते सचिन काळभोर यांना संधी मिळणार की घरचा रस्ता?
पिंपरी–चिंचवडमध्ये भाजपच्या स्वीकृत नगरसेवक पदांसाठी हालचालींना वेग

पिंपरी–चिंचवड : भारतीय जनता पार्टीला पिंपरी–चिंचवड महानगरपालिकेत एकहाती सत्ता मिळाल्यानंतर स्वीकृत नगरसेवक पदांसाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. आमदार, खासदार, मंत्री तसेच प्रदेश पातळीवरील नेत्यांकडे शिफारशीसाठी इच्छुकांची गर्दी वाढली असून, पक्षांतर्गत राजकारण तापले आहे. अशा परिस्थितीत भाजपचे सक्रीय व निष्ठावंत कार्यकर्ते सचिन काळभोर यांना आमदार महेश लांडगे संधी देणार की दुर्लक्ष करणार, याबाबत शहरात चर्चा रंगू लागली आहे.
सचिन काळभोर यांनी गेल्या अनेक वर्षांपासून पक्षासाठी तळागाळात काम केले असून, आंदोलने, मोर्चे, जनआंदोलन तसेच पक्षाची भूमिका नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात ते नेहमीच अग्रभागी राहिले आहेत. स्वीकृत नगरसेवक पदासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले असून, येत्या पंधरा दिवसांत पिंपरी–चिंचवड महापालिकेत नवीन स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. शहर अध्यक्ष व गटनेत्यांच्या शिफारशीवर ही नियुक्ती होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे आमदार, खासदारांचे नातेवाईक किंवा राजकीय दबावाखालील उमेदवारांना स्वीकृत नगरसेवक पदांवर संधी देऊ नये, अशा सूचना दिल्या आहेत. तरीही काही ठिकाणी शिफारशींचा दबाव वाढत असल्याने जुने आणि नवे कार्यकर्ते यांच्यात अस्वस्थता निर्माण झाली आहे.
२०१७ मध्ये भाजपची एकहाती सत्ता असताना स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी मिळालेल्यांपैकी काहींनी नंतर पक्ष सोडल्याचा अनुभव लक्षात घेता, यावेळी अधिक काटेकोर निवड व्हावी, अशी मागणी होत आहे. स्थानिक भूमिपुत्र, निष्ठावंत आणि स्वच्छ प्रतिमेच्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी, अशी अपेक्षा भाजप कार्यकर्ते आणि शहरवासीयांकडून व्यक्त होत आहे.
शहर अध्यक्ष शत्रुघ्न काटे, आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, अमित गोरखे, उमा खापरे, अमर साबळे, सदाशिव खाडे यांच्यासमोर योग्य उमेदवारांची निवड करणे मोठे आव्हान ठरणार आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपांपासून पक्षाची प्रतिमा वाचवण्यासाठी आणि कार्यकर्त्यांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी निष्ठावंत व स्थानिक कार्यकर्त्यांनाच संधी द्यावी, अशी ठाम भावना शहरात व्यक्त होत आहे. अंतिम यादीकडे आता संपूर्ण पिंपरी–चिंचवडचे लक्ष लागले आहे.



