टाकवे बुद्रुक येथील इंग्लिश स्कूलच्या स्नेहसंमेलनात भारतीय संस्कृतीचे दर्शन; मान्यवरांकडून शाळेच्या विकासासाठी मदतीचा ओघ

टाकवे बुद्रुक : आंदर मावळ भागातील पहिली इंग्रजी माध्यमाची शाळा म्हणून नावलौकिक मिळवलेल्या, राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ‘बाळराजे असवले इंग्लिश मीडियम स्कूल’ व ‘सरपंच चिंधू मारुती असवले इंग्लिश मीडियम हायस्कूल’चे २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाचे वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी ‘भारतीय सण आणि संस्कृती’ या थीमवर आधारित नयनरम्य सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली.
ग्रामीण भागात इंग्रजी शिक्षणाची गंगा पोहोचवण्याच्या उद्देशाने २००७ साली शेतकरी कुटुंबातील तरुणांनी पुढाकार घेऊन या शाळेची मुहूर्तमेढ रोवली. आज या शाळेत टाकवे, फळणे, खांडी, सावळा, वाहनगाव, वडेश्वर, माऊ, कशाळ, कल्हाट, पवळेवाडी, किवळे, बेलज, राजपुरी, घोणशेत, कचरेवाडी, साई, नानवली, पारोडी अशा अनेक वाड्या-वस्त्यांवरील विद्यार्थी दर्जेदार शिक्षण घेत आहेत. विशेष म्हणजे, माफक फी आणि नाममात्र देणगी तत्त्वावर चालणाऱ्या या शाळेचा दहावीचा निकाल दरवर्षी १०० टक्के लागत असून, येथून घडलेले विद्यार्थी आज वकील, फार्मसी आणि अभियांत्रिकी क्षेत्रात उज्ज्वल यश संपादन करत आहेत.
• उपस्थितीत मान्यवरांनकडुन मदतीचा हात या भव्य सोहळ्याला तळेगाव दाभाडेचे माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक गणेश भाऊ काकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ तालुका प्रभारी अध्यक्ष सुनील नाना भोंगाडे आणि प्रसिद्ध उद्योजक संदीप शेठ शिंदे (अधिराज प्रॉपर्टीज) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शाळेच्या प्रगतीचा आलेख पाहून मान्यवरांनी शाळेला भरघोस मदतीची घोषणा केली. यामध्ये गणेश काकडे यांनी संगणक कक्षासाठी मदत जाहीर केली, सुनील भोंगाडे यांनी शाळेला भव्य व्यासपीठ बांधून देणार असल्याचे सांगितले, तर संदीप शिंदे यांनी क्रीडा साहित्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले.
• मान्यवरांची मांदियाळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव चिंधु असवले होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सचिव रामदास वाडेकर, खजिनदार तानाजी असवले, उपाध्यक्ष मनोज जैन, तसेच संचालक मंडळातील भूषण असवले, पांडुरंग मोढवे, स्वामी जगताप, आतिष परदेशी, सोमनाथ असवले, राज खांडभोर, दत्ता गायकवाड, लक्ष्मण कुटे, राजेंद्र कालेकर, रामदास कोद्रे उपस्थित होते.तसेच टाकवे बुद्रुक गावातील आणि परिसरातील मान्यवर, ज्यात माजी उपसरपंच रोहिदास असवले, खरेदी विक्री संघाचे उपसभापती अमोल भोईरकर, मावळ तालुका शिवसेना उपप्रमुख सोमनाथ कोंडे, रमेश जाचक, माजी सरपंच कैलास खांडभोर, पोलीस पाटील चंद्रशेखर परचंड, माजी उपसरपंच सदाशिव बांगर, बळीराम वाडेकर, उद्योजक निवृत्ती भाऊ ठाकर आणि शेखर मालपोटे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.
• कार्यक्रमाची वैशिष्ट्ये स्नेहसंमेलनाचे औचित्य साधून शाळेच्या वार्षिक ‘कॅलेंडर’चे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे नेटके नियोजन प्रिन्सिपल राज कांबळे आणि व्हाईस प्रिन्सिपल प्रियांका कुडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव रामदास वाडेकर यांनी केले, उपस्थितांचे स्वागत संस्थापक अध्यक्ष शिवाजी असवले यांनी केले, तर आभार संचालक सोमनाथ असवले यांनी मानले.


