कुस्ती स्पर्धा

नवलाख उंब्रेत रंगला कुस्तीचा महासंग्राम! राहुल सातकर ठरला ‘मावळ केसरी’; महिलांमध्ये अनुष्का दहिभाते तर कुमार गटात ओंकार भोतेची बाजी

Spread the love

नवलाख उंब्रे (मावळ) – शड्डूचा आवाज आणि लाल मातीचा थरार… हजारो कुस्तीप्रेमींचा जल्लोष आणि शिस्तीचे पालन… अशा अभूतपूर्व वातावरणात नवलाख उंब्रे येथे मावळचा ऐतिहासिक कुस्ती सोहळा पार पडला. मावळच्या क्रीडा इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदल्या गेलेल्या ‘मावळ केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२६’ मध्ये कान्हे गावच्या पै. राहुल सत्यवान सातकर याने आपली ताकद सिद्ध करत ‘मावळ केसरी’ किताबावर आपले नाव कोरले. तर महिलांच्या ऐतिहासिक लढतीत बेडसे गावच्या पै. अनुष्का दहिभाते हिने ‘महिला मावळ केसरी’ होण्याचा बहुमान मिळवला.प्रशांत दादा भागवत युवा मंच आणि मेघाताई भागवत यांच्या विद्यमाने व पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने आयोजित ही स्पर्धा अत्यंत भव्य आणि दिमाखदार वातावरणात पार पडली.

* मावळ केसरी (पुरुष): पै. राहुल सातकर (कान्हे) याला मानाची ‘बुलेट मोटरसायकल’, मानचिन्ह आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. तसेच स्व. सचिन शेळके यांच्या स्मरणार्थ सुनील शेळके यांच्या हस्ते मानाची ‘चांदीची गदा’ प्रदान करण्यात आली.

 * महिला मावळ केसरी: पै. अनुष्का दहिभाते (बेडसे) हिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत ‘स्कूटर’ व रोख बक्षीस पटकावले.* कुमार केसरी: परंदवडीच्या पै. ओंकार शामराव भोते याने कुमार गटात वर्चस्व गाजवत ‘हिरो होंडा मोटरसायकल’ जिंकली.

या स्पर्धेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे मावळ तालुक्यात प्रथमच महिलांना मानाचे स्थान देण्यात आले. महिला कुस्तीगीरांचा सहभाग आणि त्यांचा उत्साह पाहून उपस्थितांनी त्यांचे विशेष कौतुक केले. या महासंग्रामासाठी आमदार सुनील शेळके, ट्रिपल महाराष्ट्र केसरी पै. विजय भाऊ चौधरी, आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच प्रा. विलास सर कथुरे, तळेगावचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी कुस्ती क्षेत्रातील योगदानाबद्दल पै. मारुती आण्णा वाघुजी आडकर यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’, पै. चंद्रकांत नाना दाभाडे यांना ‘मावळभूषण’, तर पै. भरत दशरथ लिम्हण यांना ‘मावळ कुस्ती महर्षी’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

स्पर्धकांसाठी केवळ बक्षिसे नाही, तर त्यांच्या सोयीसुविधेचाही बारकाईने विचार करण्यात आला होता. पैलवानांसाठी सुसज्ज बैठक व्यवस्था, कपडे बदलण्याची सोय आणि सकस आहार यासह प्रत्येक स्पर्धकाला ‘ड्रायफ्रूट किट’ वाटप करण्याचा अभिनव उपक्रम आयोजकांनी राबवला, ज्याची सर्वत्र चर्चा झाली.प्रशांत दादा भागवत आणि मेघाताई भागवत यांच्या या उत्कृष्ट नियोजनामुळे आणि नवलाख उंब्रे ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे मावळच्या कुस्ती परंपरेला एक नवी झळाळी मिळाली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button