गुन्हेगारी

वडगाव मावळमध्ये बेकायदेशीर गुटखा-पानमसाला विक्रीवर पोलिसांची धडक कारवाई; १६ जणांवर गुन्हे दाखल

Spread the love

वडगाव मावळ : शहरातील मुख्य बाजारपेठेत सुरू असलेल्या बेकायदेशीर गुटखा, पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर आळा घालण्यासाठी वडगाव मावळ पोलिसांनी गुरुवारी धडक कारवाई करत व्यापक तपासणी मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान बेकायदेशीर विक्री करणाऱ्या १६ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून संबंधित पानटपरी चालक व मालकांना कडक इशारा देण्यात आला आहे.

पोलिसांनी अचानकपणे वडगाव बाजारपेठ, वडगाव-लोणावळा रोड, वडगाव-तळेगाव-चाकण रोड तसेच मुख्य बाजारपेठ परिसरात एकाच वेळी छापेमारी केली. यासाठी पोलिसांनी पाच स्वतंत्र पथके तयार करून विविध पानटपऱ्यांवर सखोल तपासणी केली.

तपासणीदरम्यान अनेक ठिकाणी गुंगीकारक पदार्थ मिसळलेले तंबाखूजन्य पदार्थ, पानमसाला आणि गुटखा खुलेपणाने विक्रीसाठी ठेवलेले आढळले. महाराष्ट्रात गुटखा विक्रीवर बंदी असतानाही ही उत्पादने बेकायदेशीरपणे विक्री होत असल्याने पोलिसांनी ‘पान मसाला व गुटखा विक्री प्रतिबंध अधिनियम २००३’ अंतर्गत कलम ६ (ब) व २४ अन्वये संबंधितांवर गुन्हे दाखल केले. संबंधित आरोपींना समज देऊन पुढील कारवाईसाठी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही कारवाई पोलीस निरीक्षक अभिजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. मोहिमेत सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार डोईजड, जी.आर. पीएसआय जाधवराव, सहाय्यक फौजदार अजित ननवरे, आशिष काळे, हवालदार सचिन गायकवाड, किरण नांगरे, नितीन गार्डी, श्रीशैल कंटोळी, उमाजी मुंडे तसेच कॉन्स्टेबल प्रफुल्ल गोरे, प्रतीक केदारी, गणेश होळकर आणि किरण ढोले यांनी सहभाग घेतला.

या धडक कारवाईमुळे वडगाव मावळ बाजारपेठेतील बेकायदेशीर विक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने पोलिसांची ही मोहीम प्रभावी ठरली आहे. भविष्यातही अशा प्रकारच्या बेकायदेशीर विक्रीविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button