क्रीडा

कशाळ येथे यशवंतराव चव्हाण कला, क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव उत्साहात संपन्न

यशवंतराव चव्हाण महोत्सवातून शालेय विद्यार्थ्यांना मिळतय हक्काचे व्यासपीठ

Spread the love

मावळ- भोयरे येथे यशवंतराव चव्हाण कला, क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत बीट स्तरीय स्पर्धांचे दि. ९ व १० डिसेंबर २०२५ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. दोन दिवस चाललेल्या या महोत्सवात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व क्रीडाकौशल्याला भरभरून दाद मिळाली.

स्पर्धेच्या पहिल्या दिवशी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. कबड्डी, खो-खो, धावणे, लांब उडी, उंच उडी, गोळा फेक, थाळी फेक, बेडूक उड्या व लिंबू-चमचा अशा विविध स्पर्धांमध्ये भोयरे केंद्र, टाकवे बुद्रुक केंद्र, नवलाख उंबरे केंद्र व इंदोरी केंद्रातील एकूण ५६ शाळांतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

 

स्पर्धांचे उद्घाटन तळेगाव बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी मा. श्री. सुदाम वाळुंज यांच्या हस्ते झाले. यावेळी ग्रामस्थ कशाळ, शाळा व्यवस्थापन समिती, केंद्रप्रमुख श्री. साबळे, श्री. बनकर, श्री. घारे तसेच सौ. बालघरे मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेतील विजयी संघांना शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर जाधव, उपाध्यक्ष श्री. रामदास जाधव व सदस्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. ग्रामस्थांच्या वतीने सहभागी विद्यार्थी व शिक्षकांसाठी सुग्रास भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.

दुसऱ्या दिवशी कला व सांस्कृतिक स्पर्धा उत्साहात पार पडल्या. यावेळी गटशिक्षणाधिकारी सौ. शिल्पा रोडगे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत बक्षीस वितरण केले. याप्रसंगी विस्तार अधिकारी मा. श्री. काळे, विस्तार अधिकारी सौ. काळे मॅडम तसेच आजी-माजी सरपंच, उपसरपंच व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या निमित्ताने ग्रामस्थ कशाळ यांच्या वतीने सर्व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी ग्रामस्थांनी वस्तुरूप व आर्थिक स्वरूपात मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. विष्णु मोरे सर यांनी केले, तर आभार मुख्याध्यापक श्री. बाबासाहेब मस्तुद सर यांनी मानले.

या महोत्सवामुळे विद्यार्थ्यांमधील कला, क्रीडा व सांस्कृतिक गुणांना चालना मिळून सर्वांगीण विकासास हातभार लागल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button