वराळे पंचायत समिती गणात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे तालुकाध्यक्ष दत्तात्रय पडवळ निवडणुकीच्या रिंगणात
लवकर मतदारसंघात करणार प्रचार दौरा

वडगाव मावळ – मावळ तालुक्यातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत चालले असून येणाऱ्या पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी तयारीला वेग दिला आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे मावळ तालुकाध्यक्ष दत्तात्रय पडवळ यांनी स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरायचे ठरवले आहे. वराळे पंचायत समिती गणातून ते उमेदवारी दाखल करणार असल्याची माहिती मिळाली असून, पक्ष कार्यकर्त्यांमध्ये या निर्णयामुळे प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दत्तात्रय पडवळ हे गेली अनेक वर्षे मावळ तालुक्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असताना संघटनात्मक कामात सक्रिय आहेत. त्यांनी पक्ष संघटन बळकट करण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना एकत्र आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक पक्षांतर्गत तसेच ग्रामस्तरावरही होत आहे. शरद पवार गटाशी एकनिष्ठ राहून त्यांनी पक्षाचा विचार प्रत्येक गावात पोहोचवला आहे. आता प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरून विकास आणि स्थानिक प्रश्नांवर थेट काम करण्याची त्यांची तयारी पूर्ण झाली असल्याचे सांगण्यात येते.
नवलाख उंबरे गावासह आसपासच्या गावांतील मतदारांशी पडवळ यांनी अलीकडेच संवाद सुरू केला असून, स्थानिक विकासकामे, रस्त्यांची दुरवस्था, पिण्याच्या पाण्याची टंचाई, तरुणांसाठी रोजगारनिर्मिती अशा विविध विषयांवर ते मतदारांशी चर्चा करत आहेत. “राजकारण म्हणजे सेवा, सत्तेचा उपयोग लोकहितासाठी व्हावा” या विचाराने ते प्रचार मोहीम राबवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
मावळ तालुका हा शरद पवार यांच्या प्रभावक्षेत्रातील महत्त्वाचा भाग मानला जातो. त्यामुळे या तालुक्यातील निवडणुका नेहमीच राजकीय दृष्ट्या लक्षवेधी ठरतात. दत्तात्रय पडवळ यांच्या उमेदवारीमुळे पक्षातील कार्यकर्त्यांना नवचैतन्य लाभणार असून, अनेक स्थानिक नेते आणि सामाजिक संघटनांनी त्यांना पाठिंबा दर्शविला आहे. “पारदर्शक कारभार आणि विकासाभिमुख दृष्टीकोन” हे त्यांचे प्रमुख घोषवाक्य असून, त्यांनी आधीच प्रचार नियोजनासाठी कार्यकर्त्यांची बैठक घेतली आहे.
पडवळ म्हणाले, “वराळे गणातील प्रत्येक नागरिकाला जोडण्याचा प्रयत्न करणार आहे. लोकांच्या विश्वासावर उभे राहून गावोगाव विकासाची नवी पायरी चढवायची आहे. शरदचंद्र पवार साहेबांनी दिलेला विकासाचा मंत्र आणि जनतेचा आशीर्वाद या बळावर निवडणुकीत उतरतो आहे.”
त्यांच्या या घोषणेमुळे मावळ तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे. काही विरोधी पक्षांच्या नेत्यांनीही पडवळ यांच्या उमेदवारीकडे गंभीरपणे पाहणे सुरू केले आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने त्यांच्या प्रचारात सहभागी होण्यासाठी सज्ज झाले आहेत.
आगामी काही दिवसांत दत्तात्रय पडवळ मतदारसंघातील प्रमुख गावांना भेट देऊन मतदारांचा आशीर्वाद घेणार आहेत. त्यांच्या दौऱ्याला प्रारंभ नवलाख उंबरे येथून होणार असून, त्यानंतर ते संपूर्ण गणातील प्रत्येक गावात जनसंवाद सभा घेतील. स्थानिक तरुणांपासून महिलांपर्यंत सर्व घटकांशी संवाद साधत ते विकासाचा आराखडा सादर करतील.
या निवडणुकीत दत्तात्रय पडवळ यांचे नाव आता चर्चेत आले असून, त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल होताच मावळ तालुक्यातील राजकीय रंगमंचावर नव्या चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. आगामी काही आठवड्यांत प्रचार मोहीम जोर धरल्याने मावळ तालुक्यातील निवडणूक अधिक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत



