मावळ

वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिकांना कोल्हापूर महालक्ष्मी देवीचे दर्शन; युवा उद्योजक रवींद्र पवार यांचा स्तुत्य उपक्रम

Spread the love

वडगाव मावळ, दि. २४ (प्रतिनिधी): वाढदिवस केवळ केक कापून किंवा मनोरंजनाच्या कार्यक्रमांद्वारे साजरा करण्याऐवजी सामाजिक बांधिलकी जपत ज्येष्ठ नागरिकांना अध्यात्मिक आनंद देण्याचा अनोखा उपक्रम कल्हाट गावचे सुपुत्र व युवा उद्योजक रवींद्र सगाजी पवार यांनी राबविला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त शेकडो ज्येष्ठ नागरिकांना कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घडविण्यात आले.

या विशेष उपक्रमांतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी कोल्हापूर येथे दर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. पहाटेच विविध गावांतील ज्येष्ठ नागरिक उत्साहाने यात्रेसाठी रवाना झाले. कोल्हापूर येथे पोहोचल्यानंतर भाविकांनी श्री महालक्ष्मी देवीच्या मंदिरात जाऊन भक्तिभावाने दर्शन घेतले. देवीच्या चरणी प्रार्थना करत सर्वांनी सुख, समृद्धी व आरोग्यासाठी आशीर्वाद मागितले.

यावेळी रवींद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त देवीचा अभिषेक, विशेष पूजन व आरती करण्यात आली. धार्मिक वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे उपस्थित भाविकांना अध्यात्मिक समाधान लाभले. अनेक ज्येष्ठ नागरिकांनी आयुष्यातील अविस्मरणीय अनुभव असल्याची भावना व्यक्त केली.

दर्शन यात्रेत सहभागी झालेल्या ज्येष्ठ नागरिकांचा आयोजकांकडून सन्मान करण्यात आला. तसेच प्रवास, भोजन, अल्पोपहार आणि दर्शनाची संपूर्ण व्यवस्था अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आली होती. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी आयोजकांचे विशेष आभार मानले.

यावेळी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी रवींद्र पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. समाजातील ज्येष्ठ नागरिकांप्रती आदर आणि संवेदनशीलता जपत राबविण्यात आलेला हा उपक्रम इतरांसाठीही प्रेरणादायी असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक कार्याची परंपरा जपणाऱ्या या उपक्रमाचे कल्हाटसह संपूर्ण मावळ परिसरात कौतुक होत आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पवार मित्र परिवार, ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी अनेक मान्यवर, ग्रामस्थ आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button